|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबईत दुचाकी अपघातात पडेलच्या युवकाचा मृत्यू

मुंबईत दुचाकी अपघातात पडेलच्या युवकाचा मृत्यू 

सख्ख्या भावासमोरच घटना : अपघातानंतर आयशरने चिरडले

प्रतिनिधी / देवगड:

मुंबई-परेल येथील गौरीशंकर मिठाईवाले परिसरातील रहदारीच्या हमरस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या विचित्र अपघातात अक्षय अशोक हेमले (20, मूळ रा. पडेल हेमलेवाडी) हा युवक जागीच ठार झाला. पादचाऱयाच्या धक्क्याने दुचाकी घसरल्यानंतर रस्त्यावर फेकल्या गेलेल्या अक्षयच्या डोक्यावरून मागून येणाऱया आयशरचे पुढील चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. फोटोग्राफीसाठी सोबत घेऊन जाणाऱया सख्ख्या भावालाच अक्षयचा मृत्यू डोळय़ासमोर बघण्याची दुर्दैवी वेळ आली. हा अपघात रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

उपलब्ध माहितीनुसार, देवगड तालुक्यातील पडेल हेमलेवाडी येथील अक्षय हेमले हा आपला मोठा सख्खा भाऊ अमोल याच्यासमवेत शिक्षणासाठी मुंबई-परेल येथील चुलत काकांकडे गेली काही वर्षे राहत होता. तेथील महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत तो शिक्षण घेत होता. तर अमोल हा खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्या दोघांनाही फोटोग्राफीचा छंद असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी ते दोघे सकाळी 11.30 च्या सुमारास मित्रांसमवेत दुचाकींनी फोटोग्राफीसाठी घराबाहेर पडले. अक्षय हा आपल्या मित्रासमवेत हिरो प्लेझर गाडीने तर अमोल हा अन्य दुचाकीने मार्गस्थ झाला होता.

रस्त्यावर पडताच आयशरने चिरडले

परेल येथील गौरीशंकर मिठाईवाले परिसरातील रहदारीच्या हमरस्त्यावर अमोलच्या दुचाकीच्या मागोमाग असणाऱया अक्षयच्या दुचाकीला पादचाऱयाचा धक्का बसला. अक्षयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडी घसरली. यात त्याचा मित्र अन्य ठिकाणी फेकला गेला. तर अक्षय मुख्य रस्त्याच्या बाजूने पडला. याचदरम्यान मागाहून येणाऱया आयशर टेम्पोचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.

टॅक्सीतून  गाठले हॉस्पिटल

अक्षय हा आयशरच्या चाकाखाली चिरडला गेल्याचे लक्षात येताच अमोलने तात्काळ आपली दुचाकी थांबवून तेथे धाव घेतली. काही क्षणात घडलेल्या या अपघातामुळे त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याने मित्रासमवेत अक्षयला टॅक्सीत घालून केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात दुचाकीवर अक्षयसोबत असलेल्या मित्रालाही गंभीर दुखापत झाली आहे.

हॉस्पिटलमध्ये मित्रांची गर्दी

अक्षयच्या अपघाती मृत्यूची बातमी गावातील मुंबईस्थित मित्रांना समजताच  मोठय़ा संख्येने त्याच्या मित्रपरिवाराने हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. अक्षयचे मुंबईतील नातेवाईकही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. घटनेचा पंचनामा तेथील पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर विच्छेदन करून अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का

अक्षयच्या मृत्यूची बातमी पडेल गावात त्याच्या आई-वडिलांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह पडेलला आणण्यात आला. यावेळी अक्षयचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अत्यंदर्शनासाठी मुंबईस्थित मित्रपरिवारही मोठय़ा संख्येने खासगी वाहनांनी गावात दाखल झाला होता. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तेथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या पश्चात पश्चात आई-वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.

मनमिळावू अक्षयची अकाली ‘एक्झिट’

अक्षय हा अत्यंत मनमिळावू व हुशार होता. तो चांगला क्रिकेटरही होता. पडेल माध्यमिक विद्यामंदिरात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी भावासमवेत मुंबई गाठली. त्याच्या अकाली जाण्याने मित्रपरिवारासह हेमले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यंदाचा गणेशोत्सवातील गावचा प्रवास हा त्याचा अखेरचाच प्रवास ठरला.

Related posts: