|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड बंदर नौकांनी तुडुंब

देवगड बंदर नौकांनी तुडुंब 

पाच राज्यातील नौका आश्रयाला

खलाशांचा देवगडवासीयांकडून पाहुणचार

प्रतिनिधी / देवगड:

केरळ व तामिळनाडू किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई ते गोवा या दरम्यान केवळ देवगड हे एकमेव नैसर्गिकरित्या सुरक्षित बंदर असल्याने केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, गोवा तसेच मालवण, वेंगुर्ले येथील सुमारे हजारहून अधिक बोटी सोमवारी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. देवगड बंदर बोटींनी पूर्णपणे भरल्याने अन्य नौकांना रत्नागिरी येथील बंदरात आश्रयास जाण्याच्या सूचना सायंकाळी
प्रशासनाकडून देण्यात आल्या. आश्रयासाठी आलेल्या केरळ येथील बोटींच्या पार्श्वभूमीवर केरळ येथील आयपीएस अधिकारी डॉ. श्रीनिवास के यांनी देवगड बंदराला सकाळी भेट दिली. आश्रयास आलेल्या नौकांवरील खलाशी देवगडवासीयांच्या पाहुणचाराने भारावून गेले.

ओखी वादळाचा तडाखा दक्षिण भारताला बसल्यानंतर हे वादळ पश्चिम किनारपट्टीकडे केरळ, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे. ताशी सुमारे 56 कि. मी. वेगाने वारे वाहत असून लाटांची उंचीही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वच नौकांना बंदरातून बाहेर न पडण्याच्या सूचना मिळाल्याने सर्व नौका सुरक्षित बंदरात आहेत.

                          देवगड बंदर हाऊसफुल्ल

 मुंबई ते गोवादरम्यान देवगड हे एकमेव नैसर्गिकदृष्टय़ा सुरक्षित असलेले बंदर असल्याने समुद्रात मासेमारीसाठी असलेल्या नौकांना याच बंदराचा आधार आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी असलेल्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यातील नौकांना देवगड बंदरात आश्रयाला जाण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणेमार्फत देण्यात आल्या. त्यानुसार शनिवारपासून देवगड बंदरामध्ये नौका येण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ओखी चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने गुजरात सरकारने समुद्रात मासेमारी करत असलेल्या 4 हजार बोटींना महाराष्ट्रातील सुरक्षित बंदरांमध्ये आश्रय घेण्याचा संदेश पाठविला आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात सोमवारी सकाळपासून गुजरात येथील सुमारे 500 हून अधिक बोटी आश्रयाला आल्या आहेत. पाच राज्यातील बोटी देवगड बंदरात दाखल झाल्याने बंदर नौकांनी खचाखच भरून गेले आहे. नौकांनी बंदर हाऊसफुल्ल झाल्याने पोलीस व प्रशासनाने अन्य नौकांना रत्नागिरी बंदरात आश्रयासाठी जाण्याचा संदेश दिला आहे.

                             केरळचे अधिकारी दाखल

दरम्यान, केरळ येथील आयपीएस अधिकारी डॉ. श्रीनिवास के यांनी देवगड बंदराला सोमवारी सकाळी दहा वाजता भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, उपविभागीय अधिकारी नीता शिंदे, तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी तसेच पोलीस व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. श्रीनिवास यांनी केरळ येथील खलाशांशी संवाद साधला. भाषेच्या अडचणींमुळे खलाशांना आवश्यक सुविधांबाबत अडचणी जाणून घेत वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाला माहिती दिली.

सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा व प्रशासनामार्फत आश्रयास आलेल्या नौकांवरील खलाशांना धान्य, सिलिंडर, गव्हाचे पीठ, तांदूळ पुरवठा करण्यात आला.

Related posts: