|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘ओखी’चा तडाखा सिंधुदुर्गलाही

‘ओखी’चा तडाखा सिंधुदुर्गलाही 

पोलिसांच्या सिंधु 5 गस्तीनौकेला जलसमाधी

रापण संघाच्या तीन नौकांचे मोठे नुकसान

मच्छीमारांनी रात्र काढली जागून

रात्री भरतीच्या पाण्याला जोर

आपत्कालीन व्यवस्थापनाचे तीन-तेरा

प्रतिनिधी / मालवण, देवगड:

 केरळ व तामिळनाडूच्या किनाऱयावर आलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा सोमवारी सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागाला जोरदारपणे बसला. येथील किनाऱयावर आणण्यासाठी जाळी भरून समुद्रात नांगरून ठेवण्यात आलेल्या रापण संघाच्या तीन होडय़ांना जाळीसह जलसमाधी मिळाली. त्यामुळे रापण संघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारची रात्र मच्छीमारांनी होडय़ांच्या रक्षणार्थ जागून काढली. अचानक वाढलेल्या समुद्री लाटांच्या तांडवात पोलिसांच्या बंदर जेटीवरील सिंधु-5 व सिंधु-2 या स्पीडबोटींमध्ये पाणी शिरले. यात सिंधु-5 बोटीला जलसमाधी मिळाली. सुदैवाने बोटीतील पोलीस कर्मचाऱयांनी समुद्रात उडय़ा मारून आपला जीव वाचविला. रविवारी रात्री समुद्राच्या लाटांचा रौद्रावतार पाहून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या डोळय़ासमोर त्सुनामीच्या आठवणी तरळल्या. त्यावेळी आणि आताही पौर्णिमा व दत्तजयंती एकत्रित आली होती.

 आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत अनेकदा सज्जतेच्या रंगीत तालमी घेतल्या जातात. मात्र, आज प्रत्यक्षात आपत्कालीन व्यवस्थापनाची गरज असताना प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतेही मदतकार्य मच्छीमारांच्या फसलेल्या बोटी समुद्रातून बाहेर काढण्यासाठी झालेले नव्हते. आज मच्छीमारच आपल्या बोटी वाचविण्यासाठी जीवघेणा संघर्ष करीत समुद्रातील अजस्त्र लाटांना तोंड देत होते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दक्षतेबाबत मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालवण नगरपालिकेने जेसीबी उपलब्ध करून दिल्याने जलसमाधी मिळण्याच्या तयारीत असलेली एक नौका किनाऱयावर आणण्यात यश आले.

  सिंधु 5 स्पीड नौका समुद्रात बुडाली

  रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवण पोलिसांच्या येथे बंदरात उभ्या असलेल्या ‘सिंधु 5’ या स्पीड बोटीत पाणी शिरले. स्पीड बोटीत अचानक पाणी शिरल्याने बोटीतील दोन कर्मचाऱयांनी मदतीसाठी समुद्रात उडय़ा मारल्या. त्यांनी ‘सिंधु 2’ या स्पीड नौकेला गाठले. त्यानंतर दोन्ही बोटीतील कर्मचाऱयांनी ‘सिंधु 5’ स्पीड बोटीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु वाढत्या लाटांमुळे संपूर्ण बोटीत पाणी शिरले व स्पीड बोट पूर्णपणे समुद्रात बुडाली. स्पीड बोट बाहेर काढण्यात अपयश आले. समुद्राच पाणी वाढल्याने मच्छीमारांना बोटीच्या तळाशी जाताना अडचणी येत होत्या. या बोटीतील पेट्रोल बाहेर आल्याने मदत कार्यासाठी गेलेले कैलास खांदारे, मारुती भाबल, रणजीत खांदारे, सुनील खांदारे हे मच्छीमार बाहेर आले. दुपारी पाणी ओसरल्यावर ही स्पीड बोट बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनीही बोटीची माहिती जाणून घेतली.

 रविवारी रात्री किनारपट्टीवर उधाण

  रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मालवण किनारपट्टीवर समुद्राला मोठे उधाण आले होते. उधाणाचा जोर वाढल्याने दांडी येथे लोकवस्ती असणाऱया भागात पाणी आले होते. मेढा भागात रस्त्यावर पाणी आले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने दांडी, वायरी, मेढा येथील मच्छीमार रात्री किनारपट्टीवर आले होते. लाटांच्या तडाख्यात दांडी व वायरी किनाऱयावरील पाच नौका समुद्रात भरकटल्या. देवबाग मोंडकरवाडी येथील संजय मोंडकर यांच्या पर्यटक असलेल्या निवारा रुममध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले. या निवास रुममधील चार पर्यटकांना मध्यरात्री अन्य हॉटेलमध्ये हलविण्यात आले. आचरा येथील जामडूल परिसरातील रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे काही काळ गावाचा संपर्क तुटला होता. तळाशिलमध्येही समुद्राच्या बाजूने पाणी आले होते.

  सिंधु 2 स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले

  समुद्राचे पाणी सिंधु-5 व सिंधु-2 या स्पीड बोटीमध्ये घुसले. बोटीमधील कर्मचारी साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. रात्रभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. यात वाचलेल्या सिंधु-2 ला सुरक्षितस्थळी हलविण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना त्याच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले. त्यामुळे सकाळी बराचवेळ ही बोट समुद्रात बंद होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी बंदरजेटी येथे येऊन दोन्ही बोटींची पाहणी केली. मालवण बंदरात तरंगत असलेल्या ‘सिंधु 5’ ही स्पीडबोट बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक, मच्छीमार हे प्रयत्नांची शिकस्त करत होते.

 त्सुनामीची काळरात्र…

  त्सुनामीची काळरात्र आठवली की किनारपट्टीवरील नागरिकांच्या काळजात धडकी भरते. त्यावेळी पौर्णिमा अन् दत्तजयंती होती. रविवारीही ओख्खी चक्रीवादळादिवशी दत्तजयंतीच होती. रविवारी रात्री 10.30 पासून समुद्राला आलेल्या उधाणाने त्सुनामीच्या आठवणी ताज्या झाल्या. मालवण किनारपट्टीवर त्सुनामी घोंगावले, तो दिवस दत्तजयंतीचाच होता. त्यामुळे किनारपट्टीवर अनेक नागरिकांना त्सुनामीची ती काळरात्र आठवली.

Related posts: