|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेकडून पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा धोका

अमेरिकेकडून पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा धोका 

दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास हल्ल्याचा इशारा

वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था

पाकिस्तानने त्याच्या भूमीवरील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केली नाही तर आम्ही ती उद्ध्वस्त करू असा थेट इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेच्या वतीने हा इशारा सीआयए प्रमुख माइक पॉम्पियो यांनी दिला. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची अमेरिका पाकिस्तानात पुनरावृत्ती करणार असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटीस सोमवारी पाकिस्तानात दाखल झाले. मॅटिस पाकचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी आणि सैन्यप्रमुख जावेद बाजवा यांच्याशी चर्चा करतील. पेंटागॉन प्रमुख झाल्यावर मॅटिस यांचा हा पहिलाच पाक दौरा आहे.

अमेरिकेने दक्षिण आशियासाठी नवे धोरण तयार केल्यापासून पाकिस्तानसोबतच्या त्याच्या संबंधांमध्ये तणाव दिसून येतो. या धोरणानुसार पाकिस्तानवर दहशतवादी गट विशेषकरून हक्कानी नेटवर्क आणि तालिबानवर कठोर कारवाई करण्याचा दबाव टाकण्यात येत आहे.

सीआयएकडून कठोर भूमिका

सीआयए प्रमुख पॉम्पियो यांनी रीगन नॅशनल डिफेन्स फोरमच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला थेट इशारा दिला. अध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेला काय हवे हे मॅटिस पाकिस्तानला कळवतील. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही अफगाणमध्ये जे साध्य करू इच्छितो, त्यात पाकिस्तानने मदत करावी. जर पाकिस्तानने त्याला दिलेले लक्ष्य प्राप्त केले नाही तर अमेरिका शक्य ती सर्व पावले उचलणार आहे. पाकिस्तानात दहशतवादाची आश्रयस्थाने आता टिकू देणार नाही असे पॉम्पियो म्हणाले.

13 वर्षांपासून ड्रोन हल्ले

अमेरिका 2004 पासून पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ले करत आहे. ट्रम्प प्रशासन हे हल्ले आता आणखी अंतर्गत भागात घडवून आणणार आहे. पाकिस्तान नेहमीच अमेरिकेसाठी मोठी अडचण ठरला आहे. तेथे दहशतवाद्यांची अनेक आश्रयस्थाने आहेत. हे दहशतवादी अफगाणमध्ये शिरून हल्ले करतात आणि पुन्हा पाकिस्तानात परतत असल्याचे वक्तव्य सीआयएचे माजी प्रमुख लियोन पॅनेटा यांनी केले. ओबामा प्रशासनकाळात पाकिस्तानचे हे कृत्य रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. परंतु पाकिस्तान नेहमीच दुटप्पी भूमिका अवलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.

पाकिस्तानबद्दल प्रश्नचिन्ह

दहशतवाद मान्य नसल्याचे एकीकडे पाकिस्तान म्हणतो. परंतु पाकिस्तानातील दहशतवादी अफगाण आणि भारतात हल्ले करत असल्यास त्याला कोणताही फरक पडत नाही. पाकिस्तान नेहमीच अमेरिकेसाठी प्रश्नचिन्ह ठरल्याचे पॅनेटा म्हणाले.

Related posts: