|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वेग मंदावला, सतर्कता कायम

वेग मंदावला, सतर्कता कायम 

ओक्खीच्या अन्य राज्यांमधील परिणामामुळे मुंबईतही सावधगिरी : शहरात पावसाचा शिडकावा, रस्ते भिजले

प्रतिनिधी/ मुंबई

दिवसभर ढगाळ वातावरणामुळे मुंबईवर ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसतो की काय असे वातवरण होते. मात्र, वेधशाळेकडून वर्तविण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजाप्रमाणे पावसाचा शिडकावा मुंबईकरांनी अनुभवला. ओक्खी वादळाचा वेग मंदावला असला तरीही अन्य राज्यांमधील परिणामामुळे मुंबईतही सतर्कता कायम होती.

वेधशाळेने सोमवार आणि मंगळवार किनारपट्टीसाठी ओक्खी वादळाच्या धोक्याचा इशारा दिला होता. यापैकी सोमवारी कोकण किनारपट्टीवर लाटांसह वाऱयाचाही फटका दिसला. त्यामुळे मंगळवारी मुंबई किनारपट्टीवर सतर्कता वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दिशा बदलामुळे ओक्खीचा वेग मंदावल्याने मुंबई महानगर प्रदेशात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्याप्रमाणे सोमवारी मुंबईत कुलाबा, दादर, मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, बोरिवली या परिसरात पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर कमाल तापमानात वाढ झाली होती. तसेच मुंबई समुद्र किनारीपट्टय़ात वाऱयाच्या वेगात वाढ होऊन ताशी 40 ते 45 किमी वेगाने वारे वाहत होते. मात्र, या वाऱयाच्या वेगाचा परिणाम उपनगरांमध्ये दिसून येत नव्हता.

रविवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजल्यापासून ओक्खीची हालचाल नैत्य दिशेने होण्यास सुरुवात झाली. पहाटे मध्य-पूर्व अरबी समुद्रातून 16 किमी ताशी वेगाने हे वादळ निघाले. 6 तासानंतर वादळाचे मुख्य केंद्र मुंबईपासून 920 किमी अंतरावर होते. मात्र, सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईला वादळाचा स्पर्श होण्यास सुरुवात झाली. त्यातून मुंबईत पावसाचा शिडकावा सुरू झाला. (वादळाचा स्पर्श म्हणजे सॅटेलाईट चित्रातील दुधाळ दिसणारा भाग) सायंकाळी साडेसहाच्या कोकण प्रदेशाच्या समांतर समुद्रात काहीशा अंतरावर ओक्खीचे प्रमुख केंद्र होते. मुंबईला झालेला स्पर्श हा त्याचा पहिला टप्पा मानला जात आहे. मंगळवारी स्पर्श होता होता त्याची तीव्रता कमी होत जाणार आहे. तर उत्तरेस गुजरातला पोहचेपर्यंत तीव्रता नाहीशीच होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ओक्खी चक्रीवादळाने गुजरातच्या दिशेने सरकल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीचा धोका तुलनेने कमी झाला असला तरी तटरक्षक दल अरबी समुद्रातील शोधमोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक के. आर. नौटीयाल यांनी सोमवारी दिली. ओक्खीमुळे समुद्र खवळल्यामुळे तडाख्यात सापडलेल्या 183 खलाशी आणि मच्छिमारांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. तटरक्षक दलाने त्यासाठी 12 जहाज, तीन विमाने आणि 2 हेलिकॉप्टरची मदत घेतली.

 

कोकण-मुंबईत आज शाळांना सुट्टी

ओक्खी चक्रीवादळाची तीव्रता लक्षा घेता मच्छिमारांना कालच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करत मुंबई, ठाण्यासह पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या.

Related posts: