|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन 

प्रतिनिधी/ मुंबई

दीवार, त्रिशूल, शान, सिलसिला, वक्त, काला पत्थर अशा गाजलेल्या आणि संस्मरणीय चित्रपटांना आपल्या अभिनयाचा साज चढविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी अंधेरी येथील कोकिळाबेन रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगे कुणाल कपूर, करण कपूर आणि मुलगी संजना कपूर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छातीत झालेल्या संसर्गामुळे रविवारी त्यांना कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने अखेर सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे ते पुत्र. राज कपूर आणि शम्मी कपूर यांचे शशी कपूर हे सगळय़ात धाकटे बंधू होते. वडील आणि भावंडांप्रमाणेच शशी कपूर यांनी अगदी लहान वयापासून मनोरंजन सृष्टीमध्ये कारकीर्द सुरू केली. सुरुवातील त्यांनी पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये अभिनय केला. 1940 च्या काळात त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. संग्राम (1950) आणि दाना पानी (1953) या चित्रपटांमध्येही ते शशिराज या नावाने झळकले. आग (1948) आणि आवारा (1951) या दोन चित्रपटांमध्ये त्यांनी केलेली बालकलाकाराची भूमिका अविस्मरणीय ठरली. 1948 ते 1954 या काळामध्ये शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. पोस्ट बॉक्स 999 या सुनील दत्त यांच्या पदार्पण चित्रपटासाठी शशी कपूर सहाय्यक दिग्दर्शक होते. याशिवाय गेस्ट हाऊस, श्रीमान सत्यवादी या चित्रपटांसाठीही त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 1961 साली धर्मपुत्र या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून त्यांनी नव्या इनिंगला सुरुवात केली. 116 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. यापैकी 61 चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेता होते. तर 55 मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये ते झळकले. 21 चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी केल्या आणि 7 चित्रपटांमध्ये पाहुणे कलाकार म्हणून ते झळकले. द हाऊसहोल्डर,  द शेक्सपिअर-वाल्लाह या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झळकलेले ते पहिले भारतीय कलाकार होते.

सर्वोच्च पुरस्कारांनी गौरव

2011 साली सरकारचा सर्वोच्च पद्मभूषण या पुरस्काराने शशी कपूर यांना गौरविण्यात आले. 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुहाफीज, न्यू दिल्ली टाईम्स, जुनून या चित्रपटांसाठी शशी कपूर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

आ गले लग जा, चोर मचाये शोर, दीवार, रोटी कपडा और मकान, कभी कभी

त्रिशूल, सत्यम शिवम सुंदरम, शान

Related posts: