|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 268 धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 268 धावांची आघाडी 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

ऍशेस मालिकेतील येथे सुरू असलेल्या प्रकाशझोतातील दुसऱया कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 268 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकली होती.

या दुसऱया कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 4 बाद 53 धावा जमविल्या होत्या. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ आघाडी वाढविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनची पहिली कसोटी 10 गडय़ांनी जिंकली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 227 धावा केल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 442 धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पहिल्या डावात 215 धावांची भक्कम आघाडी मिळविली.

सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऍडलेडच्या वेगवान खेळपट्टीवर प्रकाश झोतामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया संघातील लेयॉन आणि स्टार्क यांच्या चपळ क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडले. त्यांनी काही अप्रतिम झेल टिपले. पहिल्या दोन सत्रामध्ये इंग्लंडचा संघ दबावाखाली खेळत होता. लेयॉनने स्वत:च्याच गोलंदाजीवर मोईन अलीचा एकहाती अप्रतिम झेल टिपला. लेयॉनने ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या व्हिन्सीला आपल्या अचूक थ्रोवर धावचीत केले होते. मोईन अलीने 57 चेंडूत 25 धावा जमविताना बेअरस्टो समवेत 30 धावांची भागिदारी केली. यानंतर पाच षटकांच्या अंतराने बेअरस्टो स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 21 धावा केल्या. वोक्स आणि ओव्हर्टन या जोडीने आठव्या गडय़ासाठी 66 धावांची भागिदारी केली. स्टार्कच्या गोलंदाजीवर वोक्स 36 धावांवर बाद झाला. भोजनानंतरच्या सत्रामध्ये ब्रॉड आणि अँडरसन यांना लेयॉनने बाद करून इंग्लंडचा पहिला डाव 227 धावांवर संपुष्टात आणला. ओव्हर्टन पाच चौकारांसह 41 धावांवर नाबाद राहिला. सोमवारी खेळाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. त्यामध्ये रूट आणि कूक यांचा समावेश होता. रूटने 9 तर कूकने 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लेयानने 60 धावांत 4, स्टार्कने 49 धावांत 3, कमिन्सने 47 धावांत 2 व हॅजलवूडने 56 धावांत 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱया डावात पहिले चार फलंदाज गमविले. बँक्रॉफ्टने 4, वॉर्नरने 1 चौकारांसह 14, ख्वाजाने 3 चौकारांसह 20 तर कर्णधार स्मिथने 1 चौकारांसह 6 धावा केल्या. इंग्लंडतर्फे अँडरसन आणि वोक्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 26 षटकांत 4 बाद 53 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव 8 बाद 442 डाव घोषित, इंग्लंड प. डाव 76.1 षटकांत सर्वबाद 227 ( कूक 37, ओव्हरटन नाबाद 41, वोक्स 36, मोईन अली 25, बेअरस्टो 21, लेयान 4/60, स्टार्क 3/49, कमिन्स 2/47, हॅजलवूड 1/56), ऑस्ट्रेलिया दु. डाव 26 षटकांत 4 बाद 53 (बँक्रॉफ्ट 4, वॉर्नर 14, ख्वाजा 20, स्मिथ 6, अँडरसन 2/16, वोक्स 2/13).

Related posts: