|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » क्रिडा » जर्मनीची भारतावर मात

जर्मनीची भारतावर मात 

वर्ल्ड हॉकी लीग फायनल : गट ब मध्ये भारताला शेवटचे स्थान

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

हॉकी वर्ल्ड लीग फायनलची दिमाखात सुरुवात करणाऱया यजमान भारताला साखळीतील शेवटच्या सामन्यात मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी गट ब मधील सामन्यात जर्मनीने भारताला 2-0 अशा गोलफरकाने पराभूत केले. या पराभवामुळे भारताला केवळ एका गुणासह गटात शेवटचे स्थान मिळाले. ऑस्टेलिया व इंग्लंड यांच्यातील सामना 2-2 असा अनिर्णीत राहिला.

हॅनर मार्टिन (17 वे मिनिट) व मॅट्स ग्राम्बुश (20 वे मिनिट) यांनी जर्मनीचे गोल केले. त्यांचा हा दुसरा विजय असून 7 गुण घेत त्यांनी गटात अग्रस्थान मिळविले आहे. जर्मनीला भक्कम बचाव असलेला संघ म्हणून ओळखले जाते, या सामन्यात त्यांनी ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. भारताची अनेक आक्रमणे त्यांनी यशस्वीपणे परतावून लावल्याने भारताला एकही गोल नोंदवता आला नाही. जर्मनीला फार कमी संधी मिळाल्या. पण त्याचा अचूक लाभ उठवित मध्यंतरालाच 2-0 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही त्यांनी ही आघाडी कायम राखत विजय साकार केला. त्यांचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर झाला. कर्णधार मार्टिन हॅनरने आकाश चिकटेच्या उजवीकडे फ्लिक करीत हा गोल नोंदवून आघाडी घेतली. तीनच मिनिटानंतर ग्राम्बुशने डी मधून जोरदार फोरहँड फटका मारला. पण भारताच्या दुर्दैवाने हा फटका विरेंद्र लाक्राकडून डिफ्लेक्ट झाला तो थेट भारतीय गोलजाळय़ात गेला. या गोलनंतर मात्र भारतीय समर्थक थंडावल्याचे दिसून आले.

पिछाडीवर पडले असले तरी भारताने प्रयत्न सोडले नाहीत. प्रतिआक्रमण करीत अनेकदा  त्यांनी जर्मनीच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारला. पण फिनिशिंगचा अभाव व जर्मनीचा अचूक बचाव यामुळे भारताला यश मिळविता आले नाही. मनदीप सिंग, गुर्जंत सिंग, एसव्ही सुनील यांचे प्रयत्नही जर्मनीच्या गोलरक्षकाने फोल ठरविले. रुपिंदर पालचा पेनल्टी कॉर्नर फटकाही वाल्टरने अचूक थोपविला. शेवटच्या मिनिटाला भारताने दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यावर त्यांना गोल नोंदवता आला नाही.

 

Related posts: