|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » घानाचा अमुझू विजेंदरची पुढील ‘शिकार’,

घानाचा अमुझू विजेंदरची पुढील ‘शिकार’, 

तिसऱया किताबासाठी जयपूरमध्ये 23 डिसेंबर रोजी होणार लढत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग डब्ल्यूबीओ ओरिएन्टल व आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट अजिंक्मयपदे स्वतःकडेच राखण्यासाठी घानाच्या अर्नेस्ट अमुझूविरुद्ध लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याची ही क्यावसायिक लढत 23 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या 9 व्यावसायिक लढतीत अपराजित राहिलेल्या विजेंदरची याआधीची शेवटची लढत गेल्या ऑगस्टमध्ये झाली आणि त्यात त्याने चीनचा नंबर एकचा बॉक्सर झुल्पिकार मैमैतियालीला नमवित डब्ल्यूबीओ ओरिएन्टल किताब पटकावला होता. ‘माझी दहावी लढत गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया जयपूरमध्ये म्हणजेच भारतात होणार असल्याने मी खरोखरच रोमांचित झालो आहे. गेल्या दोन महिन्यापासून या लढतीसाठी मी कठोर सराव करीत असून तयारीसाठी मला आणखी तीन आठवडय़ांचा कालावधी मिळणार आहे. किताबाठीची ही सलग तिसरी लढत असून ती जिंकण्यासाठी मी आतुर झालो आहे,’ असे ऑलिम्पिक कांस्यविजेता विजेंदर म्हणाला. विजेंदरने ‘विजेंदर सिंग प्रमोशन्स’ ही नवी प्रमोशन कंपनी सुरू केली असून त्याची घोषणा करताना तो पुढे म्हणाला की, ‘आपली ही कंपनी नवीन प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर लढण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.’

घानाचा अर्नेस्ट अमुझूदेखील आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील 26 वी लढत जिंकण्यास उत्सुक झाला आहे. त्याने आतापर्यंत 23 लढती जिंकल्या असून त्यापैकी 21 नॉकआऊट विजय मिळविले आहेत तर केवळ दोन लढती त्याने गमविल्या आहेत. ‘आतापर्यंत विजेंदरची माझ्यासारख्या अनुभवी व बलाढय़ मुष्टियोद्धय़ांशी गाठ पडलेली नाही. माझ्याशी लढल्यानंतर व्यावसायिक मुष्टियुद्ध किती कठीण असते याची त्याला जाणीव होईल,’ असे 34 वषीय अमुझू म्हणाला.  ‘मी या लढतीसाठी पूर्ण सज्ज झालो असून तीन-चार फेऱयांतच मी विजेंदरवर नॉकआऊट विजय मिळवेन,’ अशी दर्पोक्तीही त्याने केली.

विजेंदरच्या आतापर्यंतच्या लढती मुंबई, दिल्ली यासारख्या मेट्रो सिटीमध्ये झाल्या आहेत. यावेळी त्यात बदल झाला असून जयपूरमध्ये ही लढत होणार आहे. या संदर्भात बोलताना विजेंदर म्हणाला की, ‘मेट्रो सिटीत लढण्याची माझी इच्छा नाही. कारण हा क्रीडाप्रकार छोटय़ा शहरपर्यंत पोहोचल्यास मध्यमवर्गीयांनाही अशा लढती पहावयास मिळतील आणि त्यांची या खेळातील रुचीही वाढेल, असे मला वाटते. जयपूरवासीयांसाठी ही लढत म्हणजे रोमांचक अनुभव ठरेल, असा मला विश्वास वाटतो. शिवाय मला पाठिंबा देण्यासाठी ते मोठय़ा प्रमाणात गर्दी करतील, अशी माझी अपेक्षा आहे,’ असेही विजेंदर म्हणाला.

 

Related posts: