|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंडचा विंडीजवर डावाने विजय

न्यूझीलंडचा विंडीजवर डावाने विजय 

मालिकेत 1-0 ने आघाडी, वॅग्नर सामनावीर, ब्रॅथवेट, हेटमायरची अर्धशतके वाया

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

विंडीजचा दुसरा डाव अनपेक्षितपणे कोसल्याने न्यूझीलंडने येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्याच दिवशी विंडीजवर एक डाव 67 धावांनी दणदणीत विजय मिळवित दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ब्रॅथवेट व हेटमायर यांची अर्धशतके मात्र वाया गेली. सामन्यात 9 बळी मिळविणाऱया नील वॅग्नरला सामनावीराचा बहुमान मिळाला.

विंडीजचा पहिला 134 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने 9 बाद 520 धावांवर पहिला डाव घोषित करून विंडीजवर 386 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी दुसऱया डावात सुधारित कामगिरी करीत तिसऱया दिवशीअखेर 2 बाद 214 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येवरून विंडीजने सोमवारी चौथ्या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला. पण पेग ब्रॅथवेटचा बळी गेल्यानंतर विंडीजचा प्रतिकार थंडावला आणि उपाहाराआधीच त्यांचे तीन गडी बाद झाले. ब्रथवेटने झुंजार अर्धशतक झळकवताना 91 धावांचे योगदान दिले. त्याने 221 चेंडूत 8 चौकार व एक षटकार ठोकला. खेळपट्टीत फलंदाजीस अनुकूल असतानाही उपाहारानंतर पहिल्या चेंडूपासूनच विंडीजचा डाव कोलमडण्यास सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर सुनील ऍम्ब्रिस 18 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. सहा चेंडूनंतर शेन डॉवरिचही (3) वॅग्नरच्या गोलंदाजीवर बाद झाला. या डावातील त्याचा हा पहिला बळी होता. त्याने नंतर जेसन होल्डरलाही 7 धावांवर बाद करून सामन्यातील नववा बळी मिळविला.

ब्रॅथवेट व शाय होपवर विंडीजच्या आशा होत्या. पण ब्रॅथवेट आज केवळ 12 धावांची भर घालून बाद झाला. सँटनेरच्या सरळ चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने शाय होपसमवेत 65 धावांची भागीदारी केली. नऊ षटकानंतर नव्या चेंडूवर होपही 37 धावांवर बाद झाला. त्याला बोल्टने गलीमधील विल्यम्सनकरवी झेलबाद केले. रॉस्टन चेस 18 धावा काढून बाद झाला. बोल्टने कमिन्सला बाद करून विंडीजचा डाव 319 धावांवर संपुष्टात आणत न्यूझीलंडचा मोठा विजय साकार केला. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने 3, बोल्ट, डी ग्रँडहोम, वॅग्नर यांनी प्रत्येकी 2 तर सँटनेरने एक बळी मिळविला.

दुसरा कसोटी सामना शनिवारपासून हॅमिल्टनमध्ये सुरू होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : विंडीज प.डाव 134, न्यूझीलंड प.डाव 9 बाद 520, डाव घोषित, विंडीज दु.डाव 106 षटकांत सर्व बाद 319 (ब्रॅथवेट 8 चौकार, 1 षटकारासह 91, पॉवेल 5 चौकार, 2 षटकारांसह 40, हेटमायर 8 चौकार, 2 षटकारांसह 66, शाय होप 6 चौकारांसह 37, चेस 3 चौकारांसह 18, ऍम्ब्रिस 2 चौकार, एका षटकारासह 18, होल्डर व रॉच प्रत्येकी 7, कमिन्स 14, हेन्री 3-57, ग्रँडहोम 2-40, बोल्ट 2-87, वॅग्नर 2-102, सँटनेर 1-25).

Related posts: