|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » मॅथ्यूज-चंडिमलच्या शतकानंतरही भारत सरस

मॅथ्यूज-चंडिमलच्या शतकानंतरही भारत सरस 

लंकेच्या पहिल्या डावात 9 बाद 356 धावा, भारताविरुद्ध अद्याप 180 धावांनी पिछाडीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अँजिलो मॅथ्यूज (111) व दिनेश चंडिमल (नाबाद 147) यांच्या झुंजार शतकानंतरही येथील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात लंकेविरुद्ध यजमान भारतीय संघाचे पारडे जड राहिले. घरच्या मैदानावर हमखास बळी मिळवून देणाऱया अश्विनने (35 षटकात 3/90) भेदक मारा केल्यानंतर लंकेची तिसऱया दिवसअखेर 9 बाद 356 अशी स्थिती होती. या लढतीत ते अद्याप 180 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऑफस्पिनर अश्विनने मॅथ्यूज (111), रोशन सिल्व्हा (0) व निरोशन डिकवेला (0) यांचे बळी घेतले. पहिल्या दोन सत्रात मात्र लंकेच्या दोन्ही शतकवीरांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. वृद्धिमान साहाने घेतलेले काही उत्तम झेल, हे देखील दिवसातील ठळक वैशिष्टय़ ठरले. साहाने विशेषतः इशांत शर्मा (27 षटकात 2/93) व मोहम्मद शमी (23 षटकात 2/74) यांच्या गोलंदाजीवर उत्तम यष्टीरक्षणाचे दाखले दिले. रवींद्र जडेजाने देखील 44 षटकात 85 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. खेळपट्टी अगदीच पाटा स्वरुपाची असल्याने गोलंदाजांना प्रतिकूल स्थिती होती. तरीही, भारतीय गोलंदाजांनी प्रयत्न सुरुच ठेवले होते. दिवसभरातील तिसऱया सत्रात या प्रयत्नांना उत्तम यश प्राप्त झाले.

चंडिमल, मॅथ्यूजची झुंजार शतके

दुसरीकडे, फॉलोऑन टाळता आला, हे लंकेसाठी मोठे यश ठरले. कसोटी सामना वाचवण्यासाठी दुसरा डाव लगेचच सुरु करावा लागणार नाही, हे देखील त्यावेळी स्पष्ट झाले. मागील 5 कसोटी सामने जेमतेम 16 दिवस चालले असून या पार्श्वभूमीवर, चंडिमल व मॅथ्यूज यांची झुंज अर्थातच लक्षवेधी होती. मॅथ्यूजने पूर्ण अनुभव पणाला लावत आठवे कसोटी शतक साजरे केले. शिवाय, बहरातील कर्णधार चंडिमलसह 79.2 षटकात 181 धावांची झुंजार भागीदारी देखील साकारली. चंडिमलसाठी हे दहावे कसोटी शतक ठरले. चंडिमलने पूर्ण दिवस फलंदाजी करताना 341 चेंडूंचा सामना करत नाबाद 147 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीत 18 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. तब्बल 6 तास 20 मिनिटे फलंदाजी करणाऱया मॅथ्यूजने देखील 268 चेंडूंचा सामना करत 111 धावांचे योगदान दिले. यात त्याने 14 चौकार व 2 षटकार खेचले. नंतर अश्विनने एका ऑफब्रेक चेंडूवर त्याचा अंदाज चुकवल्यानंतर साहाने झेल टिपत ही प्रदीर्घ खेळी संपुष्टात आणली.

आश्चर्याची बाब म्हणजे मॅथ्यूज व चंडिमल उत्तम फलंदाजी करत असताना या उभयतांना दिल्लीतील प्रदूषणाची अजिबात समस्या जाणवली नाही. यापूर्वी, खेळाच्या दुसऱया दिवशी त्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले तर त्यानंतर नाराज विराट कोहलीने पहिला डाव घोषित केला होता. इथे मात्र या उभयतांनी थोडासा जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजी पुरती निष्प्रभ करण्यावर भर दिला आणि यावेळी अर्थातच त्यांना प्रदूषणाची समस्या देखील जाणवली नाही.

पहिल्या दोन्ही सत्रात अश्विनची निष्प्रभ गोलंदाजी आश्चर्याची ठरली. संयमी, धीरोदात्त फलंदाजीमुळे लंकेचा रोहित शर्मा म्हणून ओळखला जाणाऱया चंडिमलने फटक्यांची उत्तम निवड करत आपला डाव साकारला. जलद गोलंदाज इशांत शर्माने विशेषतः मॅथ्यूजला उसळत्या चेंडूवर चांगलेच हैराण केले. विराटने जुन्या चेंडूवर शमीला देखील आजमावून पाहिले. पण, ही चाल फारशी फळलीच नाही. इशांतने नंतर तिसऱया सत्रात सदिरा समरविक्रमाला (33) बाद केले. साहाने एका हाताने अप्रतिम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणत यश प्राप्त करुन दिले.

Related posts: