|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सशस्त्रक्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले

सशस्त्रक्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले 

 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

स्वातंत्र्याच्या पवित्र भावनेने प्रेरीत झालेल्या हजारो तरुणांच्या हौतात्म्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र देश अहिंसा आंदोलनामुळेच स्वतंत्र झाला असे सांगून या स्वातंत्र्यवीरांचा जाज्वल्य इतिहास अंधारात ठेवण्यात आला. क्रांतीकारकांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन आपण कर्तव्यसिद्ध झाले पाहीजे, असे प्रतिपादन
प्रा. वसंत गिरी यांनी केले.

तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये रविवारी सहावे पुष्प प्रा.वसंत गिरी यांनी गुंफले. ‘वंदे मातरम्, गाथा क्रांतीकारकांची’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.वसंत गिरी म्हणाले, ‘व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या इंग्रजांनी 18 व्या शतकाच्या पूर्वार्धातच संपूर्ण देशात आपली सत्ता बळकट केली होती. ब्रिटीशांचा साम्राज्यवादी चेहरा स्पष्ट झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी स्वातंत्र्ययुद्धाची मूहुर्तमेढ रोवली. यासाठी त्यांनी आपले सरदार अजितुल्लाखान याला लंडनला पाठवले होते. मंगल पांडेच्या आहुतीने स्वातंत्र्यसंग्रामाची लाट अल्पावधीतच साऱया देशभर पसरली. ब्रिटीशांनी हे बंड जरी मोडून काढले तरी ही स्वातंत्र्य संग्रामाची ही नांदी ठरली. पुढे वासुदेव बळंवत फडके यांनी रामोशी समाजाला संघटीत करून इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. त्यांनी पुण्यातील ब्रिटीशांची सरकारी कार्यालये जाळून टाकली. त्यांना पकडून ब्रिटीशांनी फासावर चढवले. त्यानंतर पुण्यातील चाफेकर बंधूंनी रँण्डची हत्याकरून पुणेकरांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. एका घरातील तीन तरूण मुलांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात प्राणांची आहुती दिली. अनंत कान्हेरे, अशफाकउल्ला खान, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी हसत हसत फासाचा दोर स्वतःच्या गळ्यात अडकवला. चंद्रशेखर आझादांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले. बंकीमचंद्रांनी लिहिलेले वंदे मातरम् हे काव्य क्रांतीकारकांसाठी मंत्र झाले होते. अशा असंख्य क्रांतीकारकांच्या नावाची जंत्री इतिहासालाही माहिती नाही. क्रांतीकारकांच्या बलिदानामुळेच देश स्वतंत्र झाला आहिंसा, आंदोलनामुळे नाही.’

 ऐन तारुण्यात क्रांतीकारकांना व्यक्तीगत सुखाची स्वप्ने पडली नाहीत तर त्यांना स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत केले होते. त्यांनी भोगवादाचा नव्हे तर त्यागाचा मार्ग स्विकारला. भगतसिंग, मदनलाल धिंगरा, बटुकेश्वर दत्त या उच्चशिक्षीत तरुणांनीही देशासाठी बलिदान दिले. त्यांचे जीवनकार्य आपण जाणून घेतले पाहीजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तव्यासाठी कटीबद्ध होणे आवश्यक आहे. तर आपण स्वातंत्र्याचे मोल खऱया अर्थाने समजू शकू असेही ते म्हणाले.

यावेळी पद्मजा आपटे यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत कासार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन दीपक भागवत यांनी केले. यावेळी जयंत तेंड़ुलकर, डॉ.उदय कुलकर्णी, प्रकाश सांगलीकर, मोघा जोशी, डॉ. दीपक आंबर्डेकर, महेश धर्माधिकारी, ऍड.राजू किंकर, रामचंद्र टोपकर, विनोद डिग्रजकर यांच्यासह ब्राह्मण सभेचे सभासद उपस्थित होते.

Related posts: