|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सक्षम सहकारी संस्थांना प्रोत्साहन मिळावे – आष्टेकर

सक्षम सहकारी संस्थांना प्रोत्साहन मिळावे – आष्टेकर 

 

प्रतिनिधी/ विटा

सांगली म्हणजे सहकाराची पंढरी आहे. यामध्ये ज्या संस्था स्थिरावल्या, त्यांचे चांगल्या पद्धतीने सक्षमीणकरण झाले आहे. आता ज्या सक्षम संस्था आहेत, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तरच सहकारी संस्था मोठय़ा होतील, असे प्रतिपादन उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी केले.

खानापूर तालुक्यातील आळसंद येथे विटय़ातील श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शाखेचे उद्घाटन उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आष्टेकर बोलत होते. सहाय्यक निबंधक युसुफ शेख, संस्थेचे संस्थापक दिलीप आमणे, नितीनराजे जाधव, ऍड. विनोद गोसावी, तज्ञ संचालक शिवप्रसाद शेंडे, देवदत्त राजोपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपनिबंधक आष्टेकर म्हणाले, संस्थेच्या ठेवी आणि इमारती किती मोठय़ा, यावर संस्था मोठी म्हणता येणार नाही. सभासदांना किती कर्ज देते, त्यांच्या ठेवी वेळेत परत देते का? त्यांच्या गरजा पूर्ण होतात काय, हे महत्त्वाचे असते. सर्वच संस्था खराब नाहीत. सहकारी संस्थांना संधी दिली पाहिजे. येथे सोन्याची सुबत्ता आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर व्यवहार करावे लागतात. सहकारी संस्था टिकल्यास सामान्य लोकांना सहजपणे पैसे उपलब्ध होतील. लोक सावकाराच्या कचाटय़ात सापडणार नाहीत. असा योग्य उद्देश ठेवून पतसंस्थेने काम करावे. संस्थेने कमी व्याजदराने कर्ज द्यावीत, असेही निबंधक आष्टेकर म्हणाले.

सहाय्यक निबंधक शेख यांनी ग्रामीण भागात पतसंस्था असतील, तर सर्वसामान्यांना मदत होते, असे मत व्यक्त केले. नितीनराजे जाधव म्हणाले, आज पतसंस्था ग्रामीण भागात आली आहे. संस्थापकांनी पतसंस्था प्रामाणिकपणे चालवली आहे. आळसंदमध्ये त्यांची संस्था नक्कीच मोठी होईल, असेही जाधव म्हणाले.

संस्थापक आमणे यांनी संस्थेच्या 21 वर्षातील कामकाजाच्या प्रगतीचा उल्लेख केला. आज कोअर बँकींग सुरू करताना आनंद होत आहे. ग्रामीण भागात ग्राहकांना सेवा देण्याचा उद्देश असल्याचे आमणे यांनी यावेळी सांगितले. ऍड. गोसावी म्हणाले, संस्थेने शेतीपूरक व्यवसाय करणारांना कर्ज द्यावे. शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी संस्थेने पुढकारा घ्यावा, अशी अपेक्षा ऍड. गोसावी यांनी व्यक्त केली.

यावेळी जयंत बर्वे, सुधाकर शहा, चिंतामणी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब गुळवणी यांच्यासह संस्थेचे सभासद, संचालक, कर्मचारी, बचत प्रतिनिधी, पार्श्वनाथ पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार तज्ञ संचालक शिवप्रसाद शेंडे यांनी मानले.

Related posts: