|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाळवा तालुक्यात विज वितरणमध्ये सावळा गोंधळ

वाळवा तालुक्यात विज वितरणमध्ये सावळा गोंधळ 

योगेश चौगुले/ इस्लामपूर

वाळवा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ सुरु असून   अनेक घरगुती व कृषीपंपाचे विज कनेक्शन प्रतिक्षा यादीत अडकून पडली आहेत. काही भागात ट्रान्सफार्मर सडलेल्या अवस्थेत आहेत, तर काहींना झाकण नसल्याने फ्युज पेटय़ा उघडय़ा पडलेल्या आहेत. त्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे. कनेक्शन नसल्याने पिकांचे नुकसान होत असतानाच पडलेले खांब, तुटलेल्या तारांवर वेळीच उपाययोजना न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर विद्युतवाहीन्या लोंबकळत राहील्याने शॉर्टसर्किटने ऊसाचे फड पेटत आहेत. त्यामुळे शेतकऱयांतून असंतोष व्यक्त होत आहे.

महावितरणमध्ये ठेकेदार ‘शिरजोर’ आणि अधिकारी ‘कमजोर’ अशीच सध्या अवस्था झाली आहे. एक-दोन खांब टाकणे आणि तारा ओढण्याच्या कामात लाभ कमी असल्याने वर्षा नु वर्षे ही कामे करण्यासाठी ठेकेदार टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वीज कनेक्शनची प्रतिक्षा यादी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत चालली आहे. वाळवा तालुक्यातील घरगुती व कृषीपंपांचे कनेक्शन मिटर विना व खांब न टाकल्याने प्रतिक्षा यादीवर आहेत. त्यामुळे सध्याच्या परतीच्या पावसाने विहीरी-कुपनलिकांची पाणी पातळी वाढली असली, तरी विजेअभावी पिकांचे वाळवाण होत होणार आहे.

शेतकऱयाला कुणीच वाली नसल्याची स्थिती आहे. शासन-प्रशासनाने शेतकऱयांचे प्रश्न वाऱयावर सोडून दिले आहेत. सर्वच क्षेत्रा प्रमाणे ‘महावितरण’ मध्ये देखील ठेकेदारांची शिरजोरी आहे. त्यांच्यावर अधिकाऱयांचेही नियंत्रण राहीलेले नाही. सुरु असलेल्या कामावर देखरेख करणे इतकेच ‘कर्तव्य’ असल्याचे सांगून अधिकारी हात झटकत आहेत. त्यामुळे शेतकरी वाढीव खांब व इतर कामांसाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरे झिजवून मेटाकुटीला आला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून मीटर शिल्लक नाहीत. शेतकऱयांना ती बाहेरुन जास्त दराने खरेदी करावी लागत आहेत. ट्रान्सफार्मर जळाल्याने पिके वाळत आहेत. विजवितरण विभागाकडून ट्रान्सफार्मर दुरुस्तीमध्ये चालढकल सुरु असते. ऊसदर, एफआरपी, व अन्य शेतकरी प्रश्नासाठी आंदोलन करीत शेतकरी नेते सत्तेचे वाटेकरी बनले आहेत. योगायोगाने कृषी राज्यमंत्री पद सदाभाऊ खोत यांच्याकडे आले आहे. वीज कनेक्शनसह शेतकऱयांची अन्य प्रशासकीय पातळीवर होणारी मुस्कटदाबी रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

महावितरणच्या अनागोंदी व ठेकेदारांच्या मनमानीमुळे वाळवा तालुक्यात गेल्या काही वर्षात तुटलेल्या तारांचा स्पर्श होवून अनेक शेतकऱयांना प्राण गमवावा लागला आहे. तर शॉर्टसर्कीट होऊन ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात जळून खाक झाले आहे. या बाबीचे गांभीर्यही महावितरण अधिकाऱयांना नाही. वारणा व कृष्णा नदी काठावर मळी क्षेत्र खचल्याने सध्या अनेक खांब पडले आहेत. तारा खाली आल्याने शार्टसर्किटने ऊस जळत आहेत. यात शेतकऱयाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र विजवितरण कंपनीकडून नुसता पंचनामा केला जात आहे. शेतकऱयास नुकसान भरपाई काही केल्या मिळत नाही. अनेक ठिकाणी विजेच्या पेटय़ा जमिनी पासून काही अंतरावर आहेत. त्याही जुन्या झाल्याने सडल्या आहेत, तर काहींना झाकण नाही. पेटय़ांना झाकण नसल्याने नागरीकांना व लहान मुलांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. या पेटय़ा बदलण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून वारंवार होत आहे. मात्र विजवितरणच्या अधिकाऱयांना याचे गांभीर्य राहिलेले नाही.

भरपाईसाठी ‘स्वाभीमानी’चा पाठपुरावा (04इपूर03)

वाळवा तालुक्यातील जळीत ऊस पिकाची भरपाई शेतकऱयाला मिळावी यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विज वितरण कंपनीच्या अधिकाऱयांना निवेदन दिले असल्याचे सांगून तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, विज वितरणच्या अधिकाऱयांमध्ये अनागोंदी आहे. अनेक वर्षे विज कनेक्शन प्रलंबीत आहेत. या प्रश्नासह जळीत झालेल्या शेतकऱयांच्या ऊसाची भरपाई मिळविण्यासाठी यापुढे आक्रमक भूमीका घेण्यात येईल.

Related posts: