|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मराठी ही लोकाश्रयावर जगणारी भाषा

मराठी ही लोकाश्रयावर जगणारी भाषा 

प्रतिनिधी/ वाळपई

मराठी भाषा ही लोकाश्रयाची भाषा आहे, राजाश्रयाची नाही. लोकाश्रय असलेली भाषा कधीही मरत नाही तर तिच्या विकासाचा मार्ग नव्या उत्साहाने खुला होतो. यासाठी मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता कार्यकर्त्यांना नको तर राजकारण्यांना असू द्या. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मराठी भाषिकांनी राजकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे, असे आवाहन कोलहापूर महाराष्ट्र येथील साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले. बिल्वदल सांखळी संस्थेच्या पाचव्या सत्तरी मराठी साहित्य संमेलनाच्या बिंबल येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कै. ह.मो. मराठे नगरीत महागणपती देवस्थानच्या प्रांगणात पारंपरिक समई प्रज्वलनाने या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र केरकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, सांखळी बिल्वदल संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर, उपाध्यक्ष म.कृ. पाटील, डॉ. राजेंद्र साखरदांडे, संमेलनाचे माजी अध्यक्ष व पं. महादेवशास्त्री पुरस्कार विजेते विठ्ठल पारवाडकर, संस्थेच्या सचिव ऍड. करुणा बाक्रे आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. लवटे यांनी सांगितले की, मराठी भाषेच्या विकासासाठी भाषेचा  वापर जास्तीत जास्त बोलीभाषा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाषेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात लेखनात करण्याची गरज आहे, जेणेकरून ती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. संमेलनाच्या माध्यमातून आपण भाषेची महती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व संमेलन म्हणजे विचाराला घेऊन जाणारी दिंडी आहे, असे ते म्हणाले.

जगाच्या स्तरावर आतापर्यंत 50 वर्षात 215 भाषा नष्ट झालेल्या आहेत. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे संबंधित भाषा मंडळी भाषेचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात कमी पडली आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आपण निश्चितपणे ठेवणे गरजेचे आहे.

संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर याप्रसंगी म्हणाले की, मराठी भाषेच्या गोडव्याबद्दल कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही कारण मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या लढाया आपण अनेकवेळा लढलेल्या आहेत मात्र मराठी भाषेच्या पताका कायमस्वरुपी फडकत राहण्यासाठी आपण संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृती याचे खरे संरक्षण याठिकाणी असलेल्या बहुजन समाजातील कष्टकरी मंडळीने केले आहे, हे आपण विसरून चालणार नाही. साहित्यिकांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून नवीन पिढीला लसभरीत साहित्य निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून साहित्याचा नंदादीप अशाचप्रकारे कायमस्वरुपी तेवत राहण्यासाठी मदत होणार आहे.

अनुराधा म्हाळशेकर, तरुणा परब, स्नेहा जोशी, प्रज्वलिता गाडगीळ, अनघा गुणाजी, संजय पाटील, कोटी भास्कर, महेश नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेची स्थिती मरगळलेल्या अवस्थेत आहे. कारण आज मोठय़ा प्रमाणावर मराठी भाषा विकसित करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. येणाऱया काळात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी भाषिकांनी भाषा विकसित करण्यासाठी थोडातरी वेळ देण्याची गरज व्यक्त करून यासाठी वेगवेगळय़ा स्तरावर संस्थांनी हातभार लावण्याची गरज आहे. येणाऱया काळात गोव्यातील साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सत्तरीतील युवा वर्गाला साहित्य क्षेत्रात गोडी निर्माण व्हावी, यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

विठ्ठल पारवाडकर यांना पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार प्रदान

यावेळी सत्तरीतील सुपुत्र व मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यंदाचा पुरस्कार नाटककार, पत्रकार विठ्ठल पारवाडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना विठ्ठल पारवाडकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार आपणास प्राप्त झाल्यामुळे आपण भारावून गेलो आहे. सदर प्रतिष्ठेचा पुरस्कार भावी आयुष्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे येणाऱया काळात आपल्या साहित्य क्षेत्रात नवीन दिशा मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुनिलकुमार लवटे यांचा परिचय डॉ. राजेंद्र साखरदांडे तर विठ्ठल पारवाडकर यांच्या मानपत्राचे वाचन प्रज्वलिता गाडगीळ यांनी केले. सूत्रसंचालन राघोबा पेडणेकर यांनी केले तर ऍड. करुणा बाक्रे यांनी आभार मानले.

सत्तरीतील तारे हा आगळा-वेगळा कार्यक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आला. यात विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱया व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सचिव उपेंद्र जोशी, सी.ए. मिलिंद राणे, कायदा सल्लागार ऍड. यशवंत गावस, प्राध्यापिका आदिती बर्वे, नाटय़कलाकार सूर्यकांत राणे आदींनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्नेहा म्हांबरे यांनी सांभाळले.

Related posts: