|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धारगळ येथे दोन एटीएम फोडून 33 लाख लांबविले

धारगळ येथे दोन एटीएम फोडून 33 लाख लांबविले 

प्रतिनिधी / पेडणे

धारगळ येथे कॉर्पोरेशन बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून चोरटय़ांनी सुमारे 33 लाख रुपये पळविले. ही घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमफोसीस एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी सचिन मणेरीकर यांनी सोमवारी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर दोन्ही एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, धारगळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम खासगी इमारतीमध्ये भाडेपट्टीवर घेतलेल्या जागेत बसविले होते. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे एटीएम चोरटय़ांनी गॅस कटरच्या साहाय्याने कापून आत असलेले 15,27,700 रु. काढले. चोरटय़ांनी तेथे असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत. त्यानंतर धारगळ येथील जुन्या टोलनाक्याजवळ खासगी जागेत असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरटय़ांनी आतील 17,74,400 रुपये काढले.

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यासाठी आलेले चोरटे तेथीलच एका हार्डवेअर दुकानासाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. दुकान मालकाने त्याचे चित्रण पेडणे पोलिसांकडे सादर केले आहे. यात चोरटय़ांच्या हातात कटर असल्याचे दिसत आहे. मात्र चेहऱयावर मास्क असल्याने त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत  नाही. त्यांनी काही मीटर अंतरावर आपली चारचाकी वाहन ठेवले होते तेही या कॅमेराच्या चित्रणात दिसत आहे.

दरम्यान सकाळी एटीएम फोडल्याचे कळताच एटीएममध्ये रक्कम भरण्याचे कंत्राट घेतलेल्या एमफोसीस एजन्सीचे अधिकारी सचिन मणेरीकर यांनी पेडणे पोलिसात रितसर तक्रार केली आहे. दोन्ही एटीएम मधील रक्कम मिळून सुमारे 33 लाख रुपये चोरटय़ांनी पळविल्याचे सदर तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक अनंत गावकर यांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

गेल्या 8 सप्टेंबर रोजी आगरवाडा येथे स्टेट बँकेचे एटीएम चोरटय़ांनी उचलून नेऊन ते जवळच्या जंगलात नेऊन फोडले होते. त्यातील त्यांनी 18 लाख रुपये काढले होते. काही दिवसानंतर दोन चोरटय़ांना दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले होते. रात्रीच्यावेळी एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नसल्याने चोरटय़ांचे आयतेच फावत आहे.

Related posts: