|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊस बिलावरून पालकमंत्र्यांना घेराव

ऊस बिलावरून पालकमंत्र्यांना घेराव 

@ प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. असे असताना अनेक साखर कारखानदार शेतकऱयांची ऊस बिले देण्यास तयार नाहीत. यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडल्याचे कारण पुढे करून शेतकऱयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्र्यांनाच घेराव घालून  शेतकऱयांच्या ऊस बिलांची मागणी केली. यामुळे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी तातडीने या सर्व ऊस बिलांची चौकशी करून बिले अदा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक कचाटय़ात सापडला आहे. याच बरोबर काही पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांना योग्य हमीभावही मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. महत्त्वाचे म्हणजे हमीभाव मिळवून देण्यासाठी सरकारनेच खरेदी केंदे स्थापन करावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. ऊस कारखाने सुरू झाल्यानंतर साखर कारखानदार आपल्या मनाप्रमाणे उसाला दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱयांवर अन्याय होत आहे.

बळीराजा मोठय़ा कष्टाने ऊस व इतर पिके घेत आहे. ही पिके घेताना त्याला लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे. यासाठी विविध बँका, सोसायटय़ा यामधून कर्जे घेत आहेत. पण पीक उत्पादन झाल्यानंतर त्याला भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी अडकत चालला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱयांची ऊस बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना सरकार मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्र्यांनाच घेराव घातला.

शेतकऱयांच्या उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी रसातळाला जात आहे. तेव्हा सरकारने यासाठी स्वतः माल खरेदी करण्यासाठी केंद्रे स्थापन करावीत. महत्त्वाचे म्हणजे यावषी कापूस, तूर, सोयाबिन, भुईमूग, मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक, भीमसी गदाडी, भरमू खेमलापूर, गोपाळ कोकनूर, सत्याप्पा मल्लापूरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.   

Related posts: