|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भरधाव कारची झाडाला धडक, दोघे ठार

भरधाव कारची झाडाला धडक, दोघे ठार 

वार्ताहर/ जमखंडी

   कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना जमखंडी तालुक्मयातील मुधोळ रोडवर रविवारी सायंकाळी घडली. सौंदत्ती येथे देवदर्शन करून परतत असताना ही दुर्घटना घडली. जखमींवर विजापूर  येथे उपचार सुरू आहेत.

   अर्जुन अशोक डवरी (वय 29), अशोक संभाजी संपाळ (वय 25) हे दोघे जागीच ठार झाले. तर विनोद वाघमोडे, सहजानंद बळोलगिडद व नागराज कांबळे हे गंभीर जखमी असून त्यांना उपचाराकरिता विजापूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त सर्व जमखंडी परिसरातील आहेत.

 सौंदत्ती येथे देवदर्शन व जत्रा आटोपून जमखंडी-मुधोळ मार्गे कार क्रमांक (केए 29, झेड 4843) ने परतत होते. चालकाचा भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यानजीकच्या झाडाला कारची धडक बसली. यातच कारचा चक्काचूर झाला. यात  अर्जुन अशोक डवरी, अशोक संभाजी संपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. कारची इतकी भीषण धडक होती की यात कारचा चक्काचूर तर झालाच याबरोबरच सदर झाडही मोडून पडले.   

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. तसेच रूग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना विजापूरला हलविण्यात आले. जमखंडी सीपीआय अशोक सदलगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय पुंडलिक पटातर यांनी अपघातस्थळाला भेट दिली. घटनेचा पंचनामा करुन ते अधिक तपास करीत आहेत. देवदर्शनाला गेल्यानंतर दोघा युवकांवर काळाचा घाला पडल्याने नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.

Related posts: