|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जंबगी हेस्कॉमवर 8 रोजी धडक मोर्चा

जंबगी हेस्कॉमवर 8 रोजी धडक मोर्चा 

वार्ताहर / अथणी

जंबगी हेस्कॉममध्ये येणाऱया 24 गावांना थ्रीफेज विज पुरवठा करावा यासाठी मोर्चाकाढून निवेदन देण्यात आले होते. पण याची दखल न घेता शेतकऱयांची चेष्टा केली जात आहे. यामुळे सरकारच्या विरोधात जंबगी हेस्कॉम कार्यालयावर 8 रोजी धडक मोर्चा काढून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते माणिकदादा सूर्यवंशी यांनी अथणी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सूर्यवंशी पुढे म्हणाले, या विभागात जंबगी, संबरगी, कलोती, शिरुर, पांडेगाव, खिळेगाव, आजूरसह 24 गावे आहेत. अग्रणी नदीच्या बंधाऱयात पाणी भरून राहिल्याने नदीकाठावर असलेल्या विहीरींना पाणी आले आहे. सध्या शिवारात हातातोंडाशी आलेली पिके वाया जात आहेत. या पिकांना पाणी देण्यासाठी किमान सहा तास विज पुरवठा करण्याची गरज आहे. सध्या फक्त दोन तास वीज देण्यात येत आहे.

या केंद्रामध्ये मंजूर झालेला टीसी दुसऱया गावास पाठविला याची चौकशी होणे गरजेचे आहे. पिकांना वाचविण्यासाठी किमान चार तास तरी थ्रीफेज विज पुरवठा करावा. परिक्षा तोंडावर आल्या असतानाच निरंतर ज्योतीची वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांना त्रासाचे बनले आहे. या सर्व समस्यांचे निवारण न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बसगौडा पाटील, महादेव नाईक, महादेव मंडले आदी उपस्थित होते.

 

Related posts: