|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अळवाण गल्ली दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक

अळवाण गल्ली दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक 

प्रतिनिधी /बेळगाव

रविवारी रात्री वरातीच्यावेळी दोन गटात झालेल्या वादावादीनंतर अळवण गल्ली शहापूर परिसरात दगडफेकीची घटना घडली  होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. दंगलखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी परिसरातील नागरिकांनी काही काळ धरणे धरले होते. रविवारी रात्रीच्या घटनेनंतर या परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी दगडफेक प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. शहापूरचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यु. टी. पाटील यांनी सरकारतर्फे स्वतः फिर्याद दिली असून भा.दं.वि. 143, 147, 148, 324, 153(अ), सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमवारी भा.दं.वि. 307 कलमही लावण्यात आले आहे.

सचिन चंद्रकांत मेलगे (वय 22), अजय चंद्रकांत मेलगे (वय 19), रोहन अनिल कागले (वय 20), प्रसाद नारायण बडीगेर (वय 23), कुणाल विलास कुडतरकर (वय 23, सर्व रा. आळवाण गल्ली, शहापूर), जुबेर मशीरअहमद चिकोडी (वय 19, रा. शिवाजीनगर), नवीद इरफान बेपारी (वय 19, रा. जेड गल्ली, शहापूर), सलमान सत्तार बागवाण (वय 21), मिया महम्मदहनिफ (वय 27, दोघेही रा. अळवण गल्ली-शहापूर) तसेच सतरा वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे.

सर्व सात जणांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

या संबंधी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजवरुन धरपकड करण्यात येत आहे. यापूर्वी अनेकवेळा दंगल प्रकरणी अटक झालेल्यांवर गुंडा कायद्याखाली कारवाई करण्यासंबंधी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दंगलखोरांवर कारवाई होणारच

शहापूर, कामत गल्ली, कसई खड्डा परिसरात दंगल माजविणारे कोण आहेत? याची माहिती पोलीस दलाजवळ आहे. कोणत्याही परिस्थितीत दंगलखोरांवर कारवाई होणारच अशी माहिती बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक व प्रभारी पोलीस आयुक्त डॉ. के. रामचंद्रराव यांनी पत्रकारांना दिली. 1 नोव्हेंबरपासून सातत्याने दगडफेक करुन दंगल घडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामागे राजकीय हितसंबंधाचा संशय बळावत चालला आहे.

Related posts: