|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण किनारपट्टीवर उधाणाची दहशत

कोकण किनारपट्टीवर उधाणाची दहशत 

शहर वार्ताहर/ दापोली

‘ओक्खी’ वादळाच्या प्रभावाने कोकण किनारपट्टीलगत रविवारी रात्रीपासून दहशत निर्माण केली आहे. या उधाणाने ऐन डिसेंबरमध्ये प्रथमच ‘भूतो न भविष्यति’ अशी समुद्राची पातळी दाखवली. अनेक किनारे पाण्याखाली गेल्याने येथील खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाडय़ा यांच्यासह मत्स्य व्यावसायिकांच्या सेंटरचे नुकसान झाले. हवामान खात्याने सोमवारपासून पुढील 48 तासात ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान समुद्राला अचानक रविवारी रात्री उधाण आल्याने दापोली तालुक्यातील मुरूड येथील सागरी किनाऱयावर असलेल्या टपऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच रविवारी मध्यरात्री वादळामुळे निवारा शोधत गोवा, तामिळनाडू, केरळ, गुजरात व कर्नाटकमधून तब्बल 45 बोटी रत्नागिरीतील जयगड, भगवती बंदर, मिरकरवाडा आणि मिऱया बंदर येथे दाखल झाल्या आहेत. तर मांडवीत रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उधाणाचे पाणी घुसल्याने किनाऱयावरील नागरिकात घबराट पसरली होती.

‘ओक्खी’ वादळामुळे कोकण किनारपट्टीनजीक खोल समुद्रात 50 ते 60 कि. मी. वेगाने वारे वाहत असून त्याचा परिणाम समुद्राच्या हालचालीवर झाला आहे. मुळात या वादळाची तीव्रता कोकणात जाणवेल, याचा अंदाज शासकीय विभागांना नव्हता. मात्र तीन दिवसांपूर्वी खोल समुद्रात वारे वेगाने वाहू लागल्याची चाहूल लक्षात येताच कोकणातील सर्वच मच्छीमारांनी आपापल्या नौका सुरक्षित स्थळी आणण्यास सुरूवात केली. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात तामिळनाडूच्या 23, कर्नाटकच्या 3 आणि केरळच्या 2 नौका नांगरण्यात आल्या आहेत. दाभोळमधील सर्व नौकांनी जयगड बंदरात, हर्णै बंदरातील नौकांनी आंजर्ले खाडीत नौका सुरक्षित ठेवल्या आहेत. या नौका किनाऱयावर येत असतानाच रविवारी रात्री अचानक पौर्णिमेच्या उधाणाचे पाणी वाढले. ओक्खी वादळामुळे उधाणाचा प्रभाव प्रचंड होता. फेसाळणाऱया लाटा वेगाने किनाऱयावर धडकत-धडकत पुढे येत होत्या. रविवारी रात्री साडेदहानंतर उधाणाचे पाणी भरण्यास सुरूवात झाल्यानंतर रात्री साडेबारापर्यंत समुद्राने सर्वाधिक पातळीचा उच्चांक नोंदवला. किनाऱयाच्या टोकाला असलेल्या व्यावसायिकांच्या सर्वच झोपडय़ा, त्यातील मत्स्य व्यवसायाची सामग्री तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल आदीचे उधाणातील खवळलेल्या लाटांमुळे नुकसान झाले. आपापले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सर्वच बंदरांवर धावपळ झाली.

या बाबत रायगड जिह्यातील रेवदंडा आणि दिघी बंदरांवर माल वाहतूक करणाऱया नौका मोठय़ा संख्येने उभ्या करण्यात आल्या आहेत. येथील दहा बंदरांसह सर्वच समुद्रकिनाऱयावर उधाणाचे पाणी वाढले असले तरी कोणतीही गंभीर हानीचा प्रकार अद्याप नोंदवण्यात आलेला नाही, असे रायगड जिल्हा बंदर अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सिंधुदुर्गमधील देवगड बंदरात उधाणाच्या पाण्यामुळे काही प्रमाणात सामान वाहून गेले आहे. येथेही सर्व समुद्रकिनारे रविवारी रात्री उधाणाच्या दहशतीखाली होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बंदर अधिकारी कार्यालयातही कोणत्याच हानीची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

Related posts: