|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वादळामुळे दाभोळ बंदरात विसावल्या नौका

वादळामुळे दाभोळ बंदरात विसावल्या नौका 

प्रतिनिधी/ गुहागर

येत्या 72 तासांत ओक्खी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला सतर्क राहण्याच्या दिलेल्या आदेशामुळे तालुक्यातील सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षितपणे अंजनवेल, वेलदूर (दाभोळखाडी), बुधल या बंदरात सुरक्षितपणे पोहचवल्या आहेत. रात्री 12 वाजता वेलदूर व वेळणेश्वर येथे सर्वाधिक भरतीचे पाणी भरल्याची घटना घडली आहे.

फयान वादळामध्ये अनुभव घेतल्याने मच्छिमारांनी वादळाच्या सूचनांचे पालन करत व्यवसायापेक्षा आपली सुरक्षितता महत्वाची याला प्राधान्य दिले आहे. रविवारी सायंकाळपासूनच आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. गुहागर, असगोली येथील सुमारे 12 मोठय़ा नौका अंजनवेल-भोईवाडी येथे सुरक्षित नांगरून ठेवण्यात आल्या आहेत, तर वेलदूर, दाभोळ, हर्णे, गुहागर आदी भागातील सुमारे 300 नौकांनी वादळापासून सुरक्षित समजल्या जाणाऱया दाभोळ खाडीमध्ये आसरा घेतला आहे. काही नौकांनी बुधल येथेही आसरा घेतला आहे.

वेळणेश्वरचे सरपंच नवनीत ठाकूर व जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी रविवारी मध्यरात्री वेळणेश्वर येथे सर्वाधिक भरती आल्याचे सांगितले. पावसाळय़ाच्या उधाणाप्रमाणे वेळणेश्वर समुद्रकिनारी लाटा संरक्षक बंधाऱयावर येऊन आदळत होत्या. तसेच सोमवारी सकाळीही अशाच लाटा आपटत होत्या. वेलदूर मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विठ्ठल भालेकर यांनी आपल्या मच्छिमारांच्या घरोघरी जाऊन चक्रीवादळाची सूचना देऊन नातेवाईकांनी आपल्या नौका बंदरात लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच रविवारी मध्यरात्री व सकाळी वेलदूर पार्किंग शेडपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी धडकल्याचेही सांगितले. आपल्या परिसरातील सर्व नौका सुरक्षित लावण्यात आल्या असल्याचे सांगितले.

असगोली येथील शंकर नाटेकर यांनी माहिती देताना सांगितले की, असगोली येथील मच्छिमारांनी रविवारपासूनच आपल्या मोठय़ा नौका अंजनवेल समुद्रकिनारी सुरक्षित ठेवण्यात आल्या असून छोटय़ा 50 होडय़ा समुद्रकिनाऱयावर ओढण्यात आल्या आहेत. फयान वादळाचा अनुभव घेतल्याने सर्व मच्छिमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी अगोदरच नांगरून ठेवल्याचे सांगितले.

गेले दोन दिवस समुद्रामधील मच्छिमारी बंद ठेवण्यात आल्या असून चक्रीवादळापासून सतर्कता राखण्यात आली आहे. सोमवारी दुपारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळी 6.30च्या दरम्यान तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

Related posts: