|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर आता राष्ट्रीय महामार्ग

तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर आता राष्ट्रीय महामार्ग 

रस्ते विकास महामंडळाकडून अंतिम मंजुरी

 166 जी असा नव्या महामार्गाला नंबर

प्रमोद जठारांच्या प्रयत्नांना यश

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हय़ातून गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात आला आहे. 85 किमी लांबीचा हा महामार्ग आता थ्रीलेनचा होणार असून या राष्ट्रीय महामार्गाला 166 जी असा नंबर देण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना प्राप्त झालेली नसली, तरीही राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाकडे राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याला नंबर प्राप्त झाला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. या महामार्गाच्या चौपदरीकरणासह रस्ता काँक्रीटचा असणार असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग 66 ला तळेरे येथून जोडून पुढे वैभववाडी गगनबावडामार्गे कोल्हापूरकडे जाणारा हा रस्ता आतापर्यंत राज्य मार्ग म्हणून अस्तित्वात होता. हा रस्ता वाहतूकीला आणखी सोईस्कर होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात येण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. कोल्हापूर, पुणेकडे किंबहुना मुंबईकडे जाणारी वाहतूक अनेकदा याच मार्गावरून होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती.

या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरकडून सर्वेक्षणही काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्यात घाटातील काही अपवाद वगळता अन्य ठिकाणी फोर लेन डांबरीकरणासाठी जागा उपलब्ध होत आहे. घाट भागातही फक्त डांबरीकरणासाठी आवश्यक किमान 7 मीटरची जागाही उपलब्ध होत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, फोरलेनसाठी किमान 45 मीटर जमीन संपादन करावे लागते, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

तळेरे ते कोल्हापूर या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असून त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये यापूर्वीच देण्यात आले होते. त्यावरही आता शिक्कामोर्तब झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक यामुळे अधिक सुरक्षित व निर्धोक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आतापर्यंत या रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत होती. त्यामुळे अनेकदा निधी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत असे. मात्र, आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्त्वात आल्याने त्यासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हा मार्ग चौपदरीकरण करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही लवकरच होण्याची शक्यताही सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली. त्याच्या सर्व्हेत घाट वगळता इतर ठिकाणी संपादनासाठी फारशा मोठय़ा अडचणी उपलब्ध होणार नसल्याचे समजते.  हा रस्ता काँक्रीटचा असणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राकडून सिंधुदुर्ग-गोवा जोडणारा असा हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे. तळेरे-बावडामार्गे कोल्हापूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरमध्ये तावडे हॉटेलनजीक पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे.

तळेरे ते गगनबावडामार्गे कोल्हापूर हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रयत्न केले होते. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी दिल्याने जठार यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Related posts: