|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा-जामडूल बेटाला उधाणाचा तडाखा घरांमध्ये पाणी शिरले : जाळय़ांचे नुकसान

आचरा-जामडूल बेटाला उधाणाचा तडाखा घरांमध्ये पाणी शिरले : जाळय़ांचे नुकसान 

वार्ताहर / आचरा:

 ओखी चक्रीवादळाचा परिणाम सोमवारी रात्री आचरा जामडूल बेटासह पिरावाडीलाही बसला. उधाणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने जामडूल बेटावरील घरांत उधाणाचे पाणी  शिरले. उधाणाचा जोर दोन तासापेक्षा जास्त होता. गाऊडवाडी-पिरावाडीला जोडणाऱया बंधाराकम रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ पिरावाडीचा संपर्क तुटला होता. वाहतुकीसही अडथळे येत होते. ग्रामस्थ भीतीपोटी घरे सोडून रस्त्यावर आले होते. पिरावाडी, जामडूल, हिर्लेवाडी या किनारपट्टीलगतच्या भागात काही ग्रामस्थांच्या माड, सुपारी बागेत पाणी शिरल्याने तसचे खारे पाणी विहिरीत गेल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले. तोंडवळी-तळाशिल येथील एका रापण संघाची जाळी वाहून गेल्याने सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. या आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय यंत्रणा प्रभावी न दिसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गाऊडवाडी, पिरावाडी जोड रस्त्यावर पाणी

  पिरावाडी, गाऊडवाडी जोडरस्त्यावर उधाणाचे पाणी आल्याने सुमारे दिड तास रस्ता पाण्याखाली गेला होता. पाण्यालाही प्रचंड वेग असल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. यात एक दुचाकीस्वार अडकला होता. त्याला ग्रामस्थांनी मदतीचा हात देत पाण्यातून बाहेर काढले. जामडूल बेटावरील खाडी किनारीच्या बागांमध्ये उधाणाचे पाणी शिरल्याने माड, सुपारी बागांना धोका वाढला आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दूषित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जामडूल बेटाला संरक्षक बंधाऱयाची गरज

 जामडूल बेट व पिरावाडी खाडी किनाऱयाला संरक्षक बंधाऱयाची गरज आहे. जामडूल बेट हे समुद्राच्या नस्ताच्या समोरच असल्याने येणारे भरतीचे पाणी बेटावर घुसत असून वस्तीला धोका होत आहे. यापूर्वी आलेल्या त्सुनामीमध्ये जामडूल बेटावर पाणी घुसून हाहाकार माजला होता. त्याचीच पुनरावृत्ती होते का? अशी सोमवारी स्थिती निर्माण झाली होती.

तळाशिल रापण संघाची जाळी गेली वाहून

 उधाणाचा फटका तळाशिल येथील कोळीदेव रापण संघाला बसला आहे. यात रापण संघाची 5 लाख किंमतीची जाळी वाहून गेली. जाळी पाण्यात वाहून जात असल्याचे समजताच रापण संघाचे पंढरीनाथ सादये, गोविंद पेडणेकर, गुरुनाथ पाटकर, संजय तारी, चंद्रकात सादये, दत्तात्रय बापर्डेकर आदींनी धाव घेत जाळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठय़ा प्रमाणात जाळी तुटून ती वाहून गेली. 50 जणांचा उदरनिर्वाह असणाऱया रापण संघाची जाळी वाहून गेल्याने रापण संघावर आर्थिक संकट कोसळले आहे. तोंडवळी येथे गणेश रेवंडकर, गोविंद पेडणेकर यांनी किनाऱयावर वाळत घातलेली खटवी वाहून गेल्याने सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले. वायंगणी तलाठी एम. एस. मनेर, त्रिंबक तलाठी बी. डी. नेरकर, हरिश्चंद्र घाडीगावकर यांनी पंचनामा केला.

जामडूल बेटावर पिण्याचे पाणी स्वाभिमान पक्ष पुरवणार

  जामडूल बेटावर पाणी घुसल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी जामडूल येथील लोकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविण्याची मागणी तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडे केली असून शासनाकडून पुरवठा होईपर्यंत जामडूलवासीयांना पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी स्वाभिमान पक्ष उचलणार असल्याचे सांगितले. जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच चंदन पांगे, भाऊ हडकर, संतोष कोदे, डॉ. प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत हळदणकर आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, आचरा जामडूल बेटाला संरक्षक बंधाऱयाची गरज आहे. बंधारा लवकरच माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. गेल्या साडेतीन वर्षात आमदार-खासदार यांच्या निष्क्रियतेमुळे सगळी कामे ठप्प झाली आहेत. पर्ससीन व पारंपरिक मच्छीमार यांच्यात वाद घालून मतांचे राजकारण करून लाभ उठवणारे खासदार व पालकमंत्री या ग्रामस्थांवर एवढा प्रसंग ओढवला असूनही फिरकलेच नाहीत हे खेदाचे असल्याचे त्यांनी सांगून आचऱयाला लवकरच तलाठी नियुक्त करून तलाठी व मंडल अधिकारी यांच्यामार्फत मच्छीमार व ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पंचयादी करून भरपाई देण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रांताधिकाऱयांनी तलाठी नियुक्त करून पंचयाद्या करून भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

Related posts: