|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कुसंग सदैव टाळावा

कुसंग सदैव टाळावा 

भगवंताच्या योगमायेच्या इशाऱयाने भयभीत झालेल्या कंसाला धीर देण्यासाठी त्याचे मंत्री त्याला पुढे म्हणाले-हे महाराज! वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हविर्द्रव्य देणाऱया गाईंचा आम्ही संपूर्ण नि:पात करू. ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. तो विष्णूच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे.

अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱया हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला.

श्रीशुकदेव म्हणतात-त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्मयावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. जे लोक संतांचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, इहपरलोक, आशा आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते.

आपल्या संतांनी आपल्याला वारंवार इशारा दिला आहे की कुसंग हा सर्वत्र त्याज्य मानावा. आपल्या मनावर, व्यवहारांवर आणि वर्तनावर संगतीचा फार खोलवर परिणाम होत असतो. कंस जेव्हा वसुदेव देवकीच्या समोर होता तेव्हा त्याच्या मनामध्ये किती चांगले, चांगले उत्तम विचार येत होते, त्याला पश्चात्तापदेखील होत होता. परंतु तो पुन्हा आपल्या राक्षस, दैत्य मित्रांच्या संगतीत आला आणि त्याच्या मनात दुष्ट आणि क्रूर विचारांचे थैमान सुरू झाले. याकरिता ज्यांचे स्वतःवर पूर्ण नियंत्रण नसेल त्याने हे विशेषतः लक्षात ठेवून दुस्संगापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

मिठाचा एक खडा भांडेभर दूध नासवतो, पेटीतील एक आंबा कुजला की अख्खी पेटी नासवतो, विषाचा एक थेंब अमृताचा कुंभ नासवते. याकरिता दुष्ट, कुटिल, दुर्जन माणसांच्या संगतीपासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे. ज्ञानेश्वरीतील या सुंदर ओव्या हेच सांगतात-

गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । तें घे‌ऊं नये कांहीं केलें । विचारिं पां । चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तैं हातीं धरितां जाळू । न शके का‌ई?। कां किडाचिये आटतिये पुटीं ।  पडिलें सोळें किरीटी। घेतलें चोखासाठीं । नागवीना ? ।

माउली म्हणतात-मद्याच्या भांडय़ातून आलेले गंगोदक जरी असले तरी ते घेता येत नाही. चंदन जातीने थंड असते पण त्याचा जर अग्नीशी संबंध आला तर त्याने अंग भाजणार नाही कां? अशुद्ध सोन्याच्या आटणीत शुद्ध सोने पडले आणि ते सर्व सोने चोख म्हणून घेतले तर नुकसान होते. म्हणूनच म्हणतात,  संगत घडवते किंवा बिघडवते!

Related posts: