|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण किनारपट्टीला उधाणाचा पुन्हा तडाखा

मालवण किनारपट्टीला उधाणाचा पुन्हा तडाखा 

देवबाग, दांडी, मेढा, बंदरजेटी परिसरात पाणी घुसले

देवबागात मच्छीमारांच्या जाळय़ांचे नुकसान

दोन दिवसानंतर ‘सिंधु 5’ गस्तीनौकेला समुद्राबाहेर काढण्यात यश

वार्ताहर / मालवण:

ओखी चक्रीवादळाचा परिणाम सोमवारी रात्रीही मालवण किनारपट्टीवर दिसला. काल रात्री मालवण किनारपट्टीला उधाणाचा पुन्हा तडाखा बसला. उधाणामुळे  देवबाग, तारकर्ली, मेढा, मालवण बंदर जेटी भागात मोठय़ा प्रमाणात समुद्राचे पाणी घुसले होते. देवबाग किनारपट्टीवर आलेल्या उधाणामुळे मच्छीमारांची जाळी वाहून गेल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. रविवारी रात्री जलसमाधी मिळालेल्या पोलिसांच्या ‘सिंधु 5’ या गस्तीनौकेला बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन व मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु वारा व पाऊस यामुळे बोट बाहेर काढण्यात अडचण येत होती. अखेर दोन दिवसांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता जेसीबीच्या सहाय्याने पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने ‘सिंधु 5’ ही गस्ती नौका किनाऱयावर आणली.

काल रात्री मालवणात समुद्राला पुन्हा उधाण आले. मालवण किनारपट्टीवरील बंधाऱयावरून समुद्राचे पाणी मच्छीमार्केटपर्यंत आत शिरले. बंदर जेटी, मालवण बाजारपेठ, हॉटेल सागर किनारा, मेढा जोशी वाडा येथील व्हाळीतही समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांनी मालवण बंदरजेटीवर गर्दी केली होती. रात्री वाऱयाचा जोर वाढल्याने किनापट्टीवर जोरदार लाटा धडकत होत्या. किनारपट्टीवर आज पहाटेपासून सोसाटय़ाचा वारा आणि पाऊस सुरू झाला होता. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे किनारपट्टीवर मोठय़ा उंचीच्या लाटा धडकत होत्या. मालवण किनारपट्टीवर सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत होता.

देबबाग येथील मच्छीमारांची जाळी गेली वाहून

सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. देवबाग संगम येथे किनाऱयावर होडय़ा सुरक्षित ठिकाणी हलवत असताना पाणी घुसले. त्यामुळे अनेक मच्छीमारांची जाळी वाहून गेली. यात मच्छीमारांच्या जाळय़ांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दाजी कुमठेकर, शाम कुमठेकर, उत्तम राऊळ, विशाल धुरी, रमेश धुरी व अन्य वीसजणांची जाळी वाहून गेली आहेत. देवबागातही अनेक ठिकाणी समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले.

‘सिंधु 5’ पाण्याबाहेर काढण्यात अनेक अडथळे

रविवारी रात्री जलसमाधी मिळालेल्या सिंधु 5 या पोलिसांच्या गस्ती नौकेला पाण्याबाहेर काढण्याची मोहीम मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. मालवण पोलीस प्रशासन, स्थानिक मच्छीमार, स्कुबा डायर्व्हस यांच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली. परंतु सोसाटय़ाचा वारा व अधूनमधून कोसळणाऱया पावसामुळे मोहिमेत अडथळे येत होते. नौका बाहेर काढण्यासाठी स्कुबा डायव्हर्स, होडी व्यावसायिक, मच्छीमार बांधवांचे प्रयत्न सुरू होते. समुद्राच्या तळाशी जाऊन  दोरीने बांधून उलटलेली नौका सरळ करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु या मोहिमेला दुपारपर्यंत यश आले नव्हते. गेले दोन दिवस होडी वाहतूक, वॉटरस्पोर्ट सेवा बंद आहे. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी येणाऱया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. बंदरजेटीवर पर्यटकांची मोठी गर्दी होती. आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सकाळी बंदर जेटी येथे येऊन स्पीड बोट बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांच्याकडून घेतली.

आमदार वैभव नाईक यांची भेट

आमदार नाईक यांनी देवबाग येथील जाळय़ांचे नुकसान झालेल्या मच्छीमारांची भेट घेऊन देबबागमधील स्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, सरपंच तमास फर्नांडिस, नवनिर्वाचित सरपंच जान्हवी खोबरेकर, मकरंद चोपडेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, मनोज खोबरेकर, मोरेश्वर धुरी, रमेश कद्रेकर, श्रद्धा मालंडकर, पोलीस पाटील भानुदास येरागी, गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगूत आदी उपस्थित होते. दुपारी दांडी येथील नुकसान झालेल्या रापण संघाच्या नौकांची पाहणी केली. चक्रीवादळात मोठे नुकसान झालेल्या कुबल व तोडणकर रापण संघांची पाहणी करून त्यांना मदत सुपुर्द केली. भरपाई मिळवून देण्यासाठी मत्स्य विभागाला सूचना केल्या. संबंधित विभागांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.

Related posts: