|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » छोटय़ा छोटय़ा कहाण्या, छोटे छोटे ट्विस्ट

छोटय़ा छोटय़ा कहाण्या, छोटे छोटे ट्विस्ट 

आयुष्याकडून लहान लहान सुखांची अपेक्षा असते. कधी ती मिळतात. कधी नाही. अशा काही गमती… 

साठीच्या उंबरठय़ावर पोचलं की माणसं वाढलेलं वजन, रक्तदाब, शर्करा, सुटलेलं पोट वगैरेबाबत हळवी होतात. पहाटे उठून बागेत वगैरे जाऊन व्यायाम, योगासनं वगैरे करतात. येताना भूक लागते आणि मग वाटेत लागलेल्या उडप्याकडे चापून न्याहारी होते. त्यातून हाती थोडं समाधान नक्की लाभतं. एखाद्यावेळी फिरून आल्यावर घरी जाताना नेहमीचा उडपी बंद आहे म्हणून दुकानातून इडली-डोशाचे पीठ आणि रेडीमेड चटणी घेऊन घरी जावे आणि मस्त पेपर वाचत इडली-चटणी किंवा डोसा खावा.

– आणि बायकोने सांगावे की कालचा बराच भात शिल्लक आहे.

बालमैत्रीण हा अनेकांच्या जिव्हाळय़ाचा विषय. फेसबुकसारखी माध्यमे उपलब्ध झाल्यापासून अनेकजण त्यावर बालमैत्रिणींचा शोध घेतात. पण लग्नानंतर आडनाव बदलल्यामुळे तो शोध अवघड असतो. त्यातूनही एखाद्या वेळी ती मैत्रिण अचानक फेसबुकवर भेटावी, आज देखील ती पूर्वीइतकीच सुंदर असावी, तिला घरी येण्याचे आमंत्रण द्यावे, ती येणार त्यादिवशी घर नीट आवरून ठेवावे, स्वतः वेळेवर दाढी-आंघोळ करून स्वच्छ टी शर्ट वगैरे परिधान करावा. 

– आणि तिने घरी आल्यावर आणि बायकोशी ओळख करून दिल्यावर बायकोला वहिनी म्हणून संबोधावे.

कॉलेजात असताना एखादी मैत्रिण खूप आवडलेली असते. पण तिने आपल्याला नकार दिलेला असतो. आपण बायकोला हे प्रांजळपणे सांगताना उगीच खडूसपणा म्हणून तिच्या सौंदर्याचं अतिशयोक्त वर्णन केलेलं असतं. एखाद्या वेळी सपत्नीक दंतवैद्याच्या दवाखान्यात गेलेलो असताना आणि बाहेरच्या खोलीत बसलेलो असताना अचानक ती भेटावी. 

– आणि ती कवळी बदलायला आलेली पाहून बायकोने आपल्याकडे साभिप्राय कटाक्ष टाकावा.   

बसने प्रवास करताना नेहमीच खिडकीशेजारी बसावंसं वाटतं. पण तिकीट काढायला गेलं तर कोणत्या क्रमांकाची सीट खिडकीपाशी येईल याचा अंदाज येत नाही. तिकीट देणाऱयाला गयावया करून खिडकी असलेली सीट मागितली तरी तो आपल्याकडे लक्ष देत नाही. एखाद्या वेळी बसमध्ये शिरल्यावर अचानक खिडकीशेजारची सीट मिळाल्याचा आनंद व्हावा.

– आणि नेमकी त्या आसनावरची गादी उसवलेली किंवा खराब असावी.

Related posts: