|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सादरीकरणाशिवाय ‘टर्मिनस’च्या कामाला प्रारंभ नाही

सादरीकरणाशिवाय ‘टर्मिनस’च्या कामाला प्रारंभ नाही 

नगर परिषद सर्वसाधारण सभेचा निर्णय

विरोधकांचा पुन्हा जोरदार आक्षेप तर सत्ताधाऱयांची सूचना

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेमार्फत उभारण्यात येणाऱया प्रस्तावित ट्रक टर्मिनसवरून उसळलेले राजकारण अजूनही शांत होण्याचे दिसून येत नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेतही या ट्रक टर्मिनस’ विषयावरून विरोधकांनी पुन्हा जोरदार ओरड केली. त्यावेळी ‘टर्मिनस’चा नकाशाची दुरूस्ती व त्याचे सादरीकरण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे टर्मिनसच्या कामाला प्रारंभ न करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या सभेमध्ये ‘ट्रक टर्मिनस’चा विषय पुन्हा एकदा गाजला. अगोदरच या विषयावरून जोरदार राजकारण सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांच्यामध्ये सुरू आहे. सत्ताधाऱयांनी हा ट्रक टर्मिनस मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण राष्ट्रवादी, भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला तीव्र आक्षेप घेतलेला आहे. त्यावरून सुरू असलेल्या विरोधाचे पडसाद या सभेत उमटले. राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी जोपर्यंत टर्मिनसचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याचे काम केले जाऊ नये, अन्यथा पाणी योजनेच्या विषयाप्रमाणे अवस्था होईल असे सूचित केले.

त्या मुद्दय़ाला अपक्ष नगरसेवक विकास चव्हाण यांनीही चर्चेला तोंड फोडत ट्रक टर्मिनस हा मुख्य रस्त्यालाच झाला पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. टर्मिनसच्या नकाशाबाबत नगरसेवक राजेश सावंत यांनी प्रश्न उपस्थित करत त्याची विचारणा प्रशासच्या अधिकाऱयांकडे केली. नकाशाच्या दुरूस्तीबाबत विचारणा केली असता अजूनही नकाशाच सादर झाला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. नकाशाच परिपूर्ण नसल्याचे अधिकारी मांडेकर यांनी सांगितले. नकाशा नसेल तर दिलेली परमिशन रद्द करा अशी सूचना राजेश सावंत यांनी मांडली. या टर्मिनसबाबत शिवसेनेचे गटनेते बंडय़ा साळवी यांनी सांगितले की जोपर्यंत टर्मिनसचे सभागृहाला सादरीकरण करण्यात यावे. जेणेकरून त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या सर्व बाबोंचे सर्वांना स्पष्टीकरण होईल.

सभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेप व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही ‘ट्रक टर्मिनस’च्या सादरीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. टर्मिनसच्या सर्व बाबींचे सादरीकरणातून त्याचा आराखडा काय आहे याची स्पष्टता सर्वांना होईल असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवकांचे या विषयी समाधान झाले पाहिजे हा उद्देश आहे. त्यामुळे या टर्मिनसच्या आराखडा दुरूस्तीबाबत तात्काळ नोटीस काढण्याच्या सूचना नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केल्या आहेत.

या सभेत नाचणे तलावातील गाळ उपसण्याच्या कामासाठी सुमारे 2 लाख 29 हजाराच्या वाढीव खर्चावरही विरोधी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे नियमता असेल तरच या विषयाला मंजूरी देण्यात यावे असे नगराध्यक्ष पंडित यांनी सांगितले. ओमसाई स्पोर्टस् मार्फत आयोजित नगराध्यक्ष चषक भव्य नाईट ओव्हर आर्म स्पर्धेसाठी येणाऱया खर्चाच्या मंजूरीवरूनही विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यासाठी मतदान घेण्यात आले. मंजूरीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात सत्ताधारी 16 तर विरोधी 13 अशा मतांनी हा ठराव अखेर मंजूर झाला. रस्ते दुरूस्तीच्या कामांत टंगळमंगळ करणाऱया ठेकेदारांवर कारवाई करा अशाही सूचना पंडित यांनी केल्या आहेत.

पाणी योजनेवरूनही पुन्हा ओरड

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सभेत पाणी योजनेच्या विषयाबाबत भावनिक आवाहन उपस्थित नगरसेवकांना केले. या योजनेचे श्रेय कुणी घ्यावे की घेऊ नये हा मुद्दा सोडून जनतेच्या हिताचा विचार करावा असे मत मांडले. त्यावरून राष्ट्रवादी, भाजपा, अपक्ष नगरसेवकांनी जोरदार ओरड केली. आमचा विरोध योजनेला नसून योजनेच्या वाढीव खर्चाला आहे. योजनेवर वाढीव 9 कोटीचा बोजा कमी करा अशी मागणी करत हा विषय भावनिक करू नका असे नगराध्यक्षांना सूचित केले.

Related posts: