|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र अपघातात आगार व्यवस्थापकासह दोघे ठार

विचित्र अपघातात आगार व्यवस्थापकासह दोघे ठार 

कामथे येथील घटना,

अपघातग्रस्त बसचा पंचनामा करत असताना कोळसा भरलेल्या डंपरने चिरडले,

पोलिसासह आठजण बचावले, महामार्ग चार तास ठप्प

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या एस्टी बस व बोअरवेलच्या गाडीचा पंचनामा करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कोळसा भरलेल्या डंपरने येथील आगार व्यवस्थापकासह बोअरवेल गाडीच्या मालकाला चिरडले. हा अपघात दुपारी 2.15 वाजता घडला. मात्र हेड कॉन्स्टेबल पी. बी. शिंदे यांच्यासह एसटीच्या अन्य अधिकारी, कर्मचाऱयांनी उडय़ा मारल्याने तब्बल आठजण या अपघातातून बचावले. या अपघातामुळे महामार्गावर 4 तास कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबसडक रांगा लागल्या होत्या.

रमेश एकनाथ शिलेवंत (52, मूळगाव खेड, सध्या चिपळूण आगार), राजू बालासा जमादार (मूळ जयसिंगपूर, सध्या खेंड, चिपळूण) हे दोघेजण ठार झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नागेश बिरप्पा मरगाडे (बसचालक मलकापूर आगार) हे आपल्या ताब्यातील मलकापूर-परेल ही बस घेऊन येत असताना शिवाजी महादेव चव्हाण हा आपल्या ताब्यातील बोअरवेलची गाडी चिपळूण-सावर्डे अशी घेऊन जात होता. यावेळी या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या बसमध्ये 15 प्रवासी होते. मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र बसचे 4 हजार रूपयांचे नुकसान झाले. हा अपघात 11.5 वाजता घडला.

सुरूवातीला तो सामंजस्यपणाने मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तोडगा न निघाल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल पी. बी. शिंदे हे सहकाऱयांसह घटनास्थळी गेले. याचदरम्यान, आगार व्यवस्थापक शिलेवंत हे वाहतूक नियंत्रक मोहिते, दोन मेकॅनिक यांच्यासह कामथे येथे गेले. यावेळी या सर्वांसह बसचे चालक-वाहक, कादीर इनामदार, गणेश गोंधळेकर, श्रीrराम शेटकर याचा पंचनामा करत हेते. याचदरम्यान, रमेश कोल (28, जयगड) हा आपल्या ताब्यातील डंपरमधून जयगड येथून कोळसा घेऊन खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत येत होता. मात्र तो भरधाव असल्याने अंगावर येणार याची खात्री सर्वांना झाली. त्यामुळे प्रत्येकजण मिळेल त्याठिकाणी उडय़ा मारू लागले. मात्र शिलेवंत व जमादार हे या डंपरखाली सापडले, तर अन्य आठजण बालबाल बचावले.

अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्यालगत पडलेला जमादार यांचा मृतदेह कामथे रूग्णालयात आणण्यात आला. मात्र शिलेवंत यांचा मृतदेह पलटी झालेल्या डंपरखाली अडकला होता. हा डंपर तीन क्रेन व एका जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यानंतर जेसीबीने कोळशाचा ढिगारा बाजूला करत शिलेवंत यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व कामथे रूग्णालयात नेला.

सर्वांचे अथक प्रयत्न

हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश मोरे, कामथेचे उपसरपंच प्रदीप उदेग, सचिन चोरगे, नाना महाडिक, सिद्धेश भोजने, समीर काझी, राहूल कांबळे, संदीप सावंत आदींनी विशेष प्रयत्न केले, तर झालेली वाहतूककोंडी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोडवली.

दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

अपघातानंतर अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यासाठी 4 तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्यातच घटनेचे भान विसरलेल्या अनेक हौशी कलाकारांनी या सर्व घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेकांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

लोकप्रतिनिधींची भेट

अपघाताची माहिती मिळताच आमदार भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, पंचायत समिती सभापती पूजा निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, कामथेचे सरपंच विजय माटे आदींनी कामथे रूग्णालयात येऊन शिलेवंत व जमादार यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

एसटीच्या अधिकाऱयांची धाव

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के, आगार व्यवस्थापक शकील सय्यद यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. शिलेवंत यांचा कोळशाच्या ढिगाऱयात अडकलेला मृतदेह बाहेर काढताच अधिकारी, कर्मचाऱयांना अश्रू अनावर झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शिलेवंत यांचा भाऊ खेडहून कामथे रूग्णालयात आला. भावाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला आणि सर्वांचेच डोळे पानावले.

शिलेवंत यांची 18 वर्षांची सेवा

शिलेवंत यांची एसटी महामंडळात 18 वर्षांची सेवा झाली आहे. सुरूवातीची 14 वर्षे ते लिपिक म्हणून सेवेत हेते, तर 4 वर्षापूर्वी त्यांची व्यवस्थापक म्हणून बढती झाली होती. या कारकीर्दीत त्यांनी चिपळूणसह वेंगुर्ला, खेड, दापोली आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.

शांत आणि तत्पर अधिकारी

शिलेवंत हे शांत, मनमिळावू व तत्पर अधिकारी होते. कोठेही एसटीचा छोटा-मोठा अपघात झाल्यास ते तात्काळ घटनास्थळी जात असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले इंजिनिअर आहेत. मुलगी मुंबई येथे नोकरी करत असून मुलगा त्यांच्याबरोबरच येथे रहात होता.

जमादार यांचा मोठा मित्र परिवार

जमादार हे मुळचे जयसिंगपूरचे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून येथे रहात होते. त्यांचा बोअरवेलचा व्यवसाय असल्याने मित्रपरिवारही मोठा होता. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच सर्वांनी कामथे येथे धाव घेतली.

डंपर चालक ताब्यात

अपघातानंतर डंपरचालक कोल याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related posts: