|Saturday, October 20, 2018
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडला विजयासाठी 178 धावांची गरज

इंग्लंडला विजयासाठी 178 धावांची गरज 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटीत मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 354 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 62 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. इंग्लंडला अद्याप विजयासाठी 178 धावांची गरज असून सामन्याचा आजचा दिवस बाकी आहे. दिवसअखेरीस कर्णधार ज्यो रुट 67 व ख्रिस वोक्स 5 धावांसह खेळपट्टीवर उभे होते. विशेष म्हणजे, तब्बल सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियात इंग्लंडला विजयाची नामी संधी उपलब्ध झाली आहे. इंग्लंडच्या या विजयाच्या आशा कर्णधार रुटवर अंवलबून असणार आहेत.

तत्पूर्वी, यजमान ऑस्ट्रेलियाने 4 बाद 53 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व ख्रिस वोक्स यांच्या भेदक माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 58 षटकांत अवघ्या 138 धावांवर आटोपला. दुसऱया डावात इंग्लंडच्या वेगवान माऱयासमोर एकाही ऑसी फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. उस्मान ख्वाजा व मिचेल स्टार्कने सर्वाधिक 20 धावा फटकावल्या. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसनने 43 धावांत 5 तर ख्रिस वोक्सने 36 धावांत 4 गडी बाद केले. ओव्हर्टनने 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 354 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर ऍलेस्टर कूक व मार्क स्टोनमन यांनी 53 धावांची सलामी दिली. पण, अनुभवी कूकला लियॉनने पायचीत करत 20 व्या षटकांत ही जोडी फोडली. कूकने 16 धावा केल्या. यानंतर, स्टार्कने स्टोनमनला बाद करत इंग्लंडला लागोपाठ दुसरा धक्का दिला. स्टोनमनने 65 चेंडूत 6 चौकारासह 36 धावांचे योगदान दिले. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीला आलेला जेम्स विन्स (15) फार काळ मैदानावर टिकाव धरु शकला नाही. विन्सला स्टार्कने बाद केले. यांनतर, कर्णधार रुट व डेव्हिड मालनने चौथ्या गडय़ासाठी 78 धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच मालनला (29) त्रिफळाचीत करत कमिन्सने इंग्लंडला चौथा धक्का दिला. दरम्यान, कर्णधार रुटने मात्र एका बाजुने किल्ला लढवताना शानदार अर्धशतक झळकावताना दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही.

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 62 षटकांत 4 गडी गमावत 176 धावा केल्या होत्या. तब्बल सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडला विजयाची संधी उपलब्ध झाली आहे. सामन्याचा आजचा दिवस शिल्लक असून त्यांना विजयासाठी 178 धावांची गरज आहे. दिवसअखेरीस कर्णधार रुट 9 चौकारासह 67 व ख्रिस वोक्स 5 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 442/8 घोषित व दुसरा डाव 58 षटकांत सर्वबाद 138 (ख्वाजा 20, शॉन मार्श 19, मिचेल स्टार्क 20, जेम्स अँडरसन 5/43, ख्रिस वोक्स 4/36). इंग्लंड प.डाव 227 व दुसरा डाव 62 षटकांत 4 बाद 176 (कूक 16, स्टोनमन 36, जेम्स विन्स 15, ज्यो रुट खेळत आहे 67, ख्रिस वोक्स खेळत आहे 5, मिचेल स्टार्क 2/65, पॅट कमिन्स 1/29, लियॉन 1/37).

Related posts: