|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » दिल्लीत 2020 पर्यंत पुन्हा सामना नाही

दिल्लीत 2020 पर्यंत पुन्हा सामना नाही 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

श्रीलंकन संघाने दिल्लीतील प्रदूषणाची तक्रार केल्यानंतर दिल्लीमध्ये आता किमान 2020 पर्यंत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत असून बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीला याचा प्रामुख्याने धक्का बसणार, हे जवळपास निश्चित आहे. सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱया दिवशी लंकन खेळाडूंनी प्रदूषणाची तक्रार केली व यामुळे, 26 मिनिटे खेळही थांबवावा लागला होता. दिल्लीतील प्रदूषणाचा यापूर्वी मागील महिन्यात दिल्ली मॅरेथॉनला धक्का बसला होता. त्यावेळी मॅरेथॉनची औपचारिकता पार पडली. पण, त्यापूर्वी भारतीय वैद्यकीय संघटनेने हा इव्हेंटच रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती.

‘बीसीसीआय प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये घरच्या मैदानावर पूर्ण मालिका भरवण्यासाठी प्रयत्नशील असते. आता नव्या फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमनुसार, 2020 पर्यंत कोटलाला कसोटी सामन्याचे यजमानपद लाभणे शक्य नाही’, असे मंडळाच्या एका पदाधिकाऱयाने वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेत दिल्लीत कसोटी सामना भरवण्यावर यानंतर विचार करावा लागेल, असे कबूल केले होते. सध्या सुरु असलेल्या कसोटीत लंकेने क्षेत्ररक्षण करताना प्रदूषण अधिक जाणवत असल्याचे नमूद केले. मात्र, लकमल मास्क परिधान न करता उतरला, ते दुर्मीळ उदाहरण ठरले. भारतीय संघाने 135 षटके क्षेत्ररक्षण केले. त्यांना मात्र मास्कचा आधार घ्यावा लागला नाही. लंकन खेळाडूंनी येथे एन 95 हे मास्क परिधान केले होते.

Related posts: