|Monday, December 17, 2018
You are here: Home » क्रिडा » सलग नववा मालिकाविजय अवघ्या 7 पावलांवर!

सलग नववा मालिकाविजय अवघ्या 7 पावलांवर! 

410 धावांच्या आव्हानासमोर लंकेचा डाव गडगडला, दिवसअखेर 3 बाद 31 पर्यंत पडझड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रत्यक्षात दर्जेदार खेळ साकारण्यापेक्षा रडीचा डाव साकारण्यावरच अधिक भर देत आलेला लंकेचा संघ येथील तिसऱया व शेवटच्या कसोटीत पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभवाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. दुसऱया डावात 410 धावांचे आव्हान असताना पाहुण्या संघाची मंगळवारी चौथ्या दिवसअखेर 16 षटकात 3 बाद 31 अशी पडझड झाली. भारतीय संघ आता सलग नवव्या मालिकाविजयापासून अवघ्या 7 पावलांच्या अंतरावर पोहोचल्याचे देखील यामुळे स्पष्ट झाले. दिवसअखेरीस धनंजय डिसिल्व्हा (13) व मॅथ्यूज (0) नाबाद राहिले.

लंकन खेळाडूंनी या सामन्यात दुसऱयांदा प्रदूषण प्रतिबंधक मास्क वापरत मैदान गाठले. पण, यासाठी त्यांची हुर्योच अधिक उडवली गेली. खेळपट्टीकडून चौथ्या दिवशीही गोलंदाजीला फारशी मदत नव्हती. पण, फिरकी गोलंदाजांनीच अधिक वर्चस्व गाजवले. 3 षटकांच्या भेदक माऱयानंतर काहीसे अस्वस्थ वाटलेल्या शमीने (3 षटकात 1/8) समरविक्रमाला (5) तंबूत धाडले. शमीने सातत्याने उसळत्या चेंडूचा मारा केला आणि असाच एक चेंडू थोपवण्याच्या प्रयत्नात समरविक्रमाने स्लीपमधील अजिंक्य रहाणेकडे सोपा झेल दिला. उत्तम भेदक मारा करण्यात माहीर असलेल्या रवींद्र जडेजाने करुणारत्नेला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले. वृद्धिमान साहासाठी हा सामन्यातील पाचवा झेल ठरला. लंकेने सुरंगा लकमलला नाईट वॉचमनच्या भूमिकेत जरुर पाठवले. पण, तोही बाद झाल्याने ही चाल त्यांच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले.

भारताचा डाव 246 धावांवर घोषित

तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली (58 चेंडूत 50), रोहित शर्मा (49 चेंडूत नाबाद 50) व शिखर धवन (91 चेंडूत 67 धावा) यांनी उत्तम फटकेबाजी केल्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 5 बाद 246 धावांवर घोषित केला व यानंतर लंकेसमोर चौथ्या डावात 410 धावांचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले. रहाणेला सूर मिळावा यासाठी बढती देण्यात आली होती. पण यावेळीही तो अपयशी ठरला. त्याने 10 धावा जमविल्या. पहिल्या डावाअखेर 163 धावांची आघाडी हाताशी असल्याने भारतीय फलंदाजांनी अर्थातच, जलद धावा फटकावण्यावर अधिक भर दिला. त्यांनी दुसऱया डावातील 52.2 षटकात 4.70 ची सरासरी नोंदवली, ते लक्षवेधी ठरले.

चेतेश्वर पुजारा (66 चेंडूत 49) व धवन यांनी तिसऱया गडय़ासाठी 17.2 षटकात 77 धावांची भागीदारी साकारल्यानंतर विराट व रोहित या जोडीने आणखी फटकेबाजी करत 15.2 षटकातच 90 धावा जोडल्या. सौराष्ट्राच्या पुजाराने धवनपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी साकारली. त्याच्या खेळीत 5 चौकार व संदकनच्या गोलंदाजीवरील एका उत्तूंग षटकाराचा देखील समावेश राहिला. या उभयतांनी चायनामन लक्शन संदकनचा अधिक समाचार घेतला. त्याने दिलेल्या फ्लायटेड चेंडूवर फटकेबाजीची एकही संधी त्यांनी गमावली नाही. अर्थात, नंतर पुजाराचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले आणि तो आपली निराशा लपवू शकला नाही.

कर्णधार विराटच्या डावात केवळ 3 चौकार होते. पण, त्याने उत्तम ‘रनिंग  बिटविन द विकेट’ साकारत लंकन क्षेत्ररक्षकांवर सातत्याने दडपण राखले. दुसरीकडे, रोहितने 5 चौकार वसूल करताना पूलचे अप्रतिम फटके लगावले. कसोटीत सलग सहावे अर्धशतक साजरे केल्यानंतर विराटने डाव घोषित केला. दिवसाच्या प्रारंभी लंकेने 9 बाद 356 वरुन पुढे खेळाला सुरुवात केली. पण, यात त्यांना आणखी 17 धावांची भर घालता आली होती. कर्णधार चंडिमलने दीडशतकही पूर्ण करताना 164 धावांचे योगदान दिले. त्यात 21 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. इशांत, अश्विन यांनी प्रत्येकी 3 तर शमी, जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

धावफलक

भारत पहिला डाव : 7/536 घोषित.

श्रीलंका पहिला डाव : (9/356 वरुन पुढे) दिनेश चंडिमल झे. धवन, गो. इशांत 164 (361 चेंडूत 21 चौकार, 1 षटकार), संदकन नाबाद 0 (20 चेंडू). अवांतर 16. एकूण 135.3 षटकात सर्वबाद 373.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (करुणारत्ने, 0.1 षटके), 2-14 (धनंजय, 5.1), 3-75 (परेरा, 18.4), 4-256 (मॅथ्यूज, 97.6), 5-317 (समरविक्रमा, 116.4), 6-318 (रोशन, 117.4), 7-322 (डिकवेला, 119.2), 8-331 (लकमल, 122.4), 9-343 (गमागे, 126.5), 10-373 (135.3)

गोलंदाजी

शमी 26-6-85-2, इशांत शर्मा 29.3-7-98-3, रवींद्र जडेजा 45-13-86-2, अश्विन 35-8-90-3.

भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. डिकवेला, गो. लकमल 9 (12 चेंडूत 2 चौकार), शिखर धवन यष्टीचीत डिकवेला, गो. संदकन 67 (91 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), अजिंक्य रहाणे झे. संदकन, गो. परेरा 10 (37 चेंडूत 2 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज, गो. सिल्वा 49 (66 चेंडूत 5 चौकार), विराट कोहली झे. लकमल, गो. गमागे 50 (58 चेंडूत 3 चौकार), रोहित शर्मा नाबाद 50 (49 चेंडूत 5 चौकार), रवींद्र जडेजा नाबाद 4 (4 चेंडू). अवांतर 7. एकूण 52.2 षटकात 5/246 वर घोषित.

गडी बाद होण्याचा क्रम

1-10 (मुरली विजय, 2.1), 2-29 (रहाणे, 13.4), 3-106 (पुजारा, 30.6), 4-144 (धवन, 35.2), 5-234 (विराट, 50.4).

गोलंदाजी

लकमल 14-3-60ö1, गमागे 12.2-1-48-1, परेरा 11-0-54-1, सिल्व्हा 5-0-31-1, संदकन 10-0-50-1.

श्रीलंका दुसरा डाव : करुणारत्ने झे. साहा, गो. जडेजा 13 (46 चेंडूत 1 चौकार), समरविक्रमा झे. रहाणे, गो. शमी 5 (15 चेंडू), धनंजया डिसिल्व्हा खेळत आहे 13 (30 चेंडूत 1 षटकार), लकमल त्रि. गो. जडेजा 0 (3 चेंडू), मॅथ्यूज खेळत आहे 0 (2 चेंडू). एकूण 16 षटकात 3/31.

गडी बाद होण्याचा क्रम

1-14 (समरविक्रमा, 5.5), 2-31 (करुणारत्ने, 15.1), 3-31 (लकमल, 15.4).

गोलंदाजी

इशांत शर्मा 3-0-6-0, शमी 3-1-8-1, अश्विन 5-2-12-0, जडेजा 5-2-5-2.

Related posts: