|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ढोल-ताशाच्या गजरात केडीसीसीकडे ठेवी परत करण्याची मागणी

ढोल-ताशाच्या गजरात केडीसीसीकडे ठेवी परत करण्याची मागणी 

वार्ताहर/ कार्वे

केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापन दौलत विषयी निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असून तालुक्यातील शेतकरी व दौलतचे कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील केडीसीसी बँकेच्या शाखांमधील दौलतचे कामगार त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व शेतकरी यांनी सामुदायिक खाती बंद करून असलेल्या ठेवी माघारी घेण्यासंदर्भात इशारा दिला होता.

सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऍड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली पाटणे फाटा येथून ढोल ताशाच्या गजरात हलकर्णी फाटा येथे दौलतचे कामगार व शेतकरी निघाले. मिरवणुकीने जाऊन हलकर्णी फाटा येथे असलेल्या केडीसीसीच्या शाखेत धडकले. केडीसीसी बँक व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी देऊन बँकेचे शाखाधिकारी अशोक खराडे यांच्याकडे सर्व कामगारांची खाती बंद करावीत. कामगारांसह निवेदनावर संस्था सहय़ा असलेल्या शेतकऱयांची ठेव रक्कम परत दय़ावी, अशी मागणी केली. ऍड. संतोष मळवीकर यांनी या संदर्भात  कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्हय़ासंदर्भात जाब विचारल्यावर अशोक खराडे व नाना पाटील यावर निरूत्तर झाले. शाखाधिकारी अशोक खराडे यांनी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. खाती बंद करून ठेवी परत दिल्या जातील, असे सांगितले.

ऍड. संतोष मळवीकर म्हणाले, आज हलकर्णी फाटा येथील शाखेत खाती बंद करण्यासंदर्भात मागणी केली आहे. लवकरात लवकर चंदगड तालुक्यातील सर्वच शाखांमधून मागणी करून खाती बंद करून ठेवी परत घेणार आहे. यावेळी पाटणे फाटय़ापासून ढोलताशाच्या गजरात आलेल्या मिरवणुकीत कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, जंगमहट्टीचे सरपंच विष्णू गावडे, राजेंद्र पावसकर, विष्णू पाटील, जोतिबा आपके, बाळू तेजम, मारूती नागुर्डेकर, महादेव फाटक, अनिल होडगे उपस्थित होते.

Related posts: