|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अपंगांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी :

अपंगांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी : 

प्रतिनिधी/ आजरा

अपंग व्यक्तींना समाजिक जीवनात अनेक अडचणी येतात. त्यांना सन्मानाची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. यासाठी सशक्त लोकांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. रचना होलम यांनी केले. अपंग दिनाचे औचित्य साधून अपंग पुनर्वसन संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून तहसीलदार अनिता देशमुख उपस्थित होत्या.

प्रारंभी तहसीलदार देशमुख यांच्या हस्ते या मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात कॉ. संपत देसाई यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. शिवाय अपंग, विधवा, परीत्यक्त्यांच्या समस्यांची माहिती दिली. त्यांना पेन्शन मिळविण्यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. यासाठी प्रशासनाने सर्कल निहाय कॅम्प आयोजित करून संबंधिक अधिकारी व कर्मचाऱयांना उपस्थित ठेवावे. त्याठिकाणीच प्रस्तावांची छाननी करून मंजुरीसाठी प्रस्ताव पुढे पाठवावेत अशी मागणी केली. शिवाय शेजारील कर्नाटक व गोवा राज्यात अपंगांना दोन तर विधवा व परीत्यक्त्यांना तीन हजार रूपये पेन्शन दिली जाते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही पेन्शन मिळावी यासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव करून शासनाकडे पाठविण्याची मागणीही कॉ. देसाई यांनी केले.

यावेळी सभापती सौ. होलम यांनी अपंगांसाठी असणाऱया शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. नवनाथ शिंदे यांनी संवेदना म्हणजे काय हे सागंताना संत गाडगेबाबांच्या कार्याचे उदाहरण देत अपंग, विधवा, परीत्यक्त्यांच्या वेदना पाहून समोरच्याला त्याच्या शतपटीने वेदना होतील तेंव्हाच संवेदना जागृत होईल असे सांगितले. अपंग म्हणून न थांबता तुमची धडपड निरंतर चालू राहीली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी सर्व श्रमिक संघाचे बी. के. कांबळे यांनी प्रशासनातील अधिकाऱयांकडून अपंगांना दिल्या जाणाऱया वागणूकीचा पाढा वाचला. यामध्ये सुधारण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर उपसभापती शिरिष देसाई यांनी शारीरीक व्यंग असले तरी मनाला अपंगत्व येऊ देऊ नका असे आवाहन केले. उपेक्षित घटकांच्या समस्या मोठय़ा असून त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष गुरूनाथ पाटील यांनी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार देशमुख यांनी अपंग, विधवा, परीत्यक्त्यांना तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांकडून कोणत्याही प्रकारची चुकीची वागणूक मिळाल्यास तक्रार करण्याची सूचना केली. काम करताना बंधन येत असून उत्पन्नाची मर्यादा वाढवून घेतल्यास अनेकांना योजनांचा लाभ देणे शक्य असून त्यासाठी शासन पातळीवर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सदस्य उदयराज पवार, बशीर खेडेकर, सदस्या सौ. वर्षा कांबळे, सौ. वर्षा बागडी, अपंग संघटनेच्या सौ. सरीता कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील विधवा, परीत्यक्त्या व अपंग उपस्थित होते. कृष्णा सावंत यांनी सूत्रसंचलन केले तर रवी कांबळे यांनी आभार मानले.

 

Related posts: