|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लिफ्टमध्ये चारजण अडकले

लिफ्टमध्ये चारजण अडकले 

प्रतिनिधी/ सांगली

वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची पंचाईत झाल्याचे आपण पहातो.पण अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने चारजणांना लिफ्टमध्ये अडकून पडाव लागल्याने चांगलीच पंचाईत झाली. सुमारे तासभर लिफ्टमध्ये अडकून पडल्याने चारहीजण गुदमरले होते. पण, महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टची काच फोडून शिडीच्या सहाय्याने त्यांची सुटका केली.

 येथील हॉटेल नवरत्न शेजारी असणाऱया शिवमेरेडियन इमारतीमध्ये मंगळवारी ही घटना घडली. याबाबत माहिती अशी, मंगळवारी महावितरणचा वीजपुरवठा बहुतांशी वेळा बंदच असतो. पण, कधी कधी महावितरण वीजपुरवठा सुरूच ठेवते. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास  शिवमेरेडियनमध्ये असणाऱया लिफ्टमधून लिफ्टमनसह चारजण खाली उतरत होते. पण, अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने लिफ्टमध्येच अडकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमहापौर विजय घाडगे, राजेश जगदाळे यांना ही माहिती समजल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी जाण्याची सूचना उपमहापौर घाडगे यांनी दिली. अग्नीशमन अधिकारी शिवाजी दुधाळ यांच्यासह अग्निशमनचे जवान काही मिनीटातच घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी सुमारे तासभर प्रयत्न करून लिफ्टची काच फोडली. याकूब युनूस शेख वय 72 हा लिफ्टमन, विजय शंकर पाटील वय 68 रा.मिरज, तसेच प्राजक्ता प्रविण पाटील वय 26 आणि दीपाली माने वफ 25 या मॅक्स इन्शुरन्स कंपनीच्या दोन कर्मचारी अशा चार जणांना जवानांनी शिडी लावून बाहेर काढले. लिफ्टमध्ये हवा बंद असल्याने चारजण गुदमरले होते. तर दोन्ही महिला घाबरल्या होत्या. सुदैवाने तासभर अडकून पडूनही कोणाला फटका बसला नाही. घटनास्थळी बघ्यांची गदी मोठी झाली होती.

Related posts: