|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोडली खाण दुर्घटनेतील ऑपरेटरचा मृतदेह सापडला

कोडली खाण दुर्घटनेतील ऑपरेटरचा मृतदेह सापडला 

दुर्घटनेस कारणीभूत अधिकाऱयांवर कारवाईची मागणी : मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार

प्रतिनिधी/ धारबांदोडा

 शोध मोहिमेच्या चौथ्या दिवशी काल मंगळवारी सायं. 6.20 वा. सुमारास सेसा वेदांत खाणीवर मातीच्या ढिगाऱयाखाली गाढल्या गेलेल्या मनोज अनंत नाईक (42, रा. खांडेपार) या मशिन ऑपरेटरचा मृतदेह सापडला. तत्पूर्वी दुपारी 1.45 वा. सुमारास त्याचा मोबाईल संच मातीच्या ढिगाऱयात सापडला होता. मात्र उत्खनन पिठात कोसळलेले रिपर मशिन अद्याप सापडलेले नाही.

 दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा त्याच्या नातेवाईकांनी दिला आहे. त्यामुळे वेदांत कंपनीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शनिवारी सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने ही दुर्घटना घडली होती. माल उपसण्याच्या कामात गुंतलेले रिपर मशिन उत्खनन पिठात कोसळले होते, तर त्यावरील ऑपरेटर मनोज नाईक हा ढिगाऱयाखाली गाढला गेला होता. घटनेनंतर पहिले दोन दिवस बचावकार्य संथगतीने चालले होते. मात्र मनोजचे नातेवाईक व सरकारी अधिकाऱयांच्या वाढत्या दबावामुळे सोमवारपासून कंपनीने शोधकार्याला गती दिली होती.

 काल मंगळवारी राष्ट्रीय आपत्ती बचाव दलातील पुणे येथील पथक बोलावून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. ज्या ठिकाणी मनोज गाढला जाण्याची शक्यता होती तोच केंद्रबिंदू लक्षात घेऊन तपालासाला योग्य दिशा देण्यात आली. मनोजच्या मोबाईल संचच्या लोकेशनाचा त्यासाठी महत्त्वाचा उपयोग झाला. त्यामुळेच प्रथम त्याचा मोबाईल संच हाती लागला व काही तासांनी त्याचा मृतदेह सापडला. उत्खनन पिठात कोसळलेले रिपर मशीन मात्र अद्याप सापडलेले नाही.

तोपर्यंत मृतदेह स्वीकारला जाणार नाही

खाणीवर घडलेली ही घटना हा निव्वळ अपघात नसून कंनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप मनोजच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील जमिन खचत असल्याची कल्पना कंपनी अधिकाऱयांना होती. शनिवारच्या दिवशी पहिल्या पाळीवरील काही कामगारांनी कंपनीच्या पर्यवेक्षकाला त्याची कल्पनाही दिली होती. काही ठिकाणी जमिनीला पडलेल्या भेगा लक्षात घेऊन कामगारांनी त्याठिकाणी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पर्यवेक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली व मनोजचा त्यात बळी गेला.  तेथील परिस्थिती लक्षात घेऊन व संभाव्य धोका ओळखून काम करण्याचा धोका पत्करला नसता तर कदाचित मनोज हा या दुर्घटनेपासून वाचला असता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळाली पाहिजे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता होईपर्यंत मनोजचा मृतदेह कुटुंबियांकडून ताब्यात घेतला जाणार नाही, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Related posts: