|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अपहरणाचा प्रयत्न, खंडणी प्रकरणी दोघांना अटक

अपहरणाचा प्रयत्न, खंडणी प्रकरणी दोघांना अटक 

पर्वरी पोलिसांची कामगिरी : संशयित मूळ केरळचे

प्रतिनिधी/ पर्वरी

रस्ता दुरूस्ती व डांबरीकरणाची मोठी कंत्राटे घेणाऱया ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागणी व अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी दोघा संशयितांना त्यांच्या भ्रमणध्वनीसह सापळा रचून शिताफिने अटक केली.

केवळ भ्रमणध्वनीच्याआधारे कसून तपास करून चार दिवसात दोन्ही संशयितांना निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात पर्वरी पोलिसांना यश आले. या संसयितांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याची कामे करणाऱया अब्दूल चेरेकाल (मूळ केरळ) या ठेकेदाराला त्याच्या मोबाईवर धमकीचे फोन येत होते. 10 लाख रुपयांची मागणी या कॉलद्वारे होत होती, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. याबाबत ठेकेदाराचे व्यवस्थापक उदय पालयेकर यांनी पर्वरी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीचे दखल घेत निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कत्राटदार अब्दुल्ला यांनी संशयितांशी संपर्क साधून 10 लाख रुपयाची रक्कम देण्याची तयारी दर्शविली. यादरम्यान कॉलचे लोकेशन शोधून काढण्यात यश आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. पर्वरी पोलिसांनी साध्या वेशात म्हापसा ग्रीनपार्कजवळ गाडी पाठवून संशयिताला रक्कम नेण्यासाठी बोलाविण्यात आले. संशयित मात्र रक्कम घेण्यासाठी आले नाहीत. पकडले जाण्याच्या भीतीने नंबर नसलेल्या वाहनाने संशयित तारी येथून पसार झाले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरची चौकशी केली असता सदर नंबर साहिर अनास ए. पी. उर्फ अंचू (23) व दिलशान पी. ए. महमंद कुणी (22, दोघेही मूळ केरळ) यांच्या नावे होते. लोकेशन शोधून काढून पोलिसांनी त्यांना आसगाव बार्देश येथे पडकले. त्यांच्याजवळ 3 मोबाईल व 1 आयफोन हस्तगत केला, असे पोलिसांनी सांगितले. साहिर अनास हा सराईत असून त्याच्याविरोधात केरळ पोलिसात गुन्हे नोंद आहेत. दिलशान कुणीला त्याने केरळहून याच कामासाठी आणले होते. हे मोठे रॅकेट असण्याचा संशय पोलिसांना आहे.

 अपहरण करण्याचा प्रयत्न फसला

तत्पूर्वी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी पर्वरी येथून आपल्या घरी जात असताना पीडब्ल्यूडी ठेकेदार अब्दुल यांना चौघांनी घेरले होते. त्यांना उचलून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न या चौघांनी केला होता, मात्र अब्दुल यांनी सर्वशक्तीनिशी त्यांना झडका देऊन स्वतःची सुटका करून घेतली. या झटापटीत गाडीतून खाली पडल्याने त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला होता. आरडाओरड केल्याने संशयितांनी तेथून पळ काढला होता. या घटनेनंतर संशयितांनी अब्दूला यांना मोबाईलद्वारे धमकाविण्यास सुरूवात करून पैशांची मागणी केली. यासाठी संशयितांनी आपल्या मित्राच्या मोबाईलचा वापर केला होता.

पर्वरी पोलिसांनी अखेर या गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळविले आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सावंत, कॉन्स्टेबर नितीन नाईक, नितीन गावकर, सागर खोर्जुवेकर, गिरीश राऊळ, गणेश मातोंडकर व योगेश शिंदे यांनी तपासात भाग घेतला.

Related posts: