|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाणस्तारी येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन

बाणस्तारी येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन 

वार्ताहर/ माशेल

राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असलेल्या बाणस्तार येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन  सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते नुकतेच झाले. साधारण रु. 10 कोटी 28 लाख खर्चून हाती घेण्यात आलेले हे काम वर्षभरात भरात पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 यावेळी कला आणि सांस्कृतीमंत्री गोविंद गावडे, भोम अडकोणचे सरपंच सुनील भोमकर, पंचसदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते विजयकुमार वेरेकर, विजय म्हार्दोळकर, दत्तप्रसाद कामत, दिगंबर नाईक आदी उपस्थित होते. फित कापून व नामफलकाचे अनावरण करून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

वृंदावन इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन या आस्थापनातर्फे हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग 16 पत्रादेवी पणजी रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 4 ओल्ड गोवा फोंडाचे कामही लवकरच मार्गी लागणार असल्यचे त्यांनी सांगितले. भोम येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन याठिकाणी उड्डाण पुलाऐवजी बाजूच्या शेतातून बगलमार्ग तयार केला जाईल. याठिकाणी उड्डाण पूल हा चांगला पर्याय होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. माशेल, बाणस्तारी रस्त्याचे रुंदीकरण लवकरच हाती घेण्या येणार असून त्यापूर्वी तेथील दुकानदारांचे योग्य जागेत स्थलांतर होणार आहे. गोव्यातील महामार्ग विस्तार व विकासाचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाते. त्याचप्रमाणे मंत्री गोविंद गावडे, पांडुरंग मडकईकर, विश्वजीत राणे, आमदार दीपक पाऊसकर यांचे सहकार्य लाभत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

फोंडा व तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवठा 2018 पर्यंत सुरळीत होणार आहे. खांडेपार रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून तेही येत्या वर्षांत मार्गी लागणार आहे, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले, वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा बाणस्तारी येथील भुयारी मार्गाचे काम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी वेळेत पूर्ण केलेले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या चांगल्या प्रकारे चालले आहे. ग्रामीण भागातही रस्ते पोचविण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. बऱयाच ठिकाणी रस्ते व इतर विकासकामांना विरोध होत असतो. मात्र भविष्यातील विकासाची गरज म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. प्रियोळ मतदारसंघातील डोंगराळ भागात रस्ते होणे ही काळाची गरज आहे. मंत्री सुदिन ढवळीकर या कामासाठी पूर्ण सहकार्य देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री सुदिन ढवळीकर व मंत्री गोविंद गावडे यांनी कामाची पाहणी केली. विजयकुमार वेरेकर व विजय म्हार्दोळकर यांनी स्वागत केले.

Related posts: