|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तटरक्षक दलाचे बचावकार्य, एमपीटीचे मदत कार्य!

तटरक्षक दलाचे बचावकार्य, एमपीटीचे मदत कार्य! 

प्रतिनिधी/ वास्को

‘ओखी’ चक्रीवादळापासून जीवीत हानी टाळण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने चांगली कामगिरी केली असून आतापर्यंत विविध राज्यातील 183  मच्छीमारांना सुखरूपरित्या वाचवले आहे. 12 गस्ती जहाजे, 3 डोर्नियर विमाने आणि 2 हेलिकॉप्टरसह तटरक्षक दल शोध व बचाव कार्यात व्यस्त आहे. दुसऱया बाजूने मुरगाव बंदराजवळील समुद्रात आश्रयाला आलेल्या मच्छीमारांना मदत पुरवण्याचे काम एमपीटीने हाती घेतले आहे. सुरक्षेसाठी तीनशेहून अधिक ट्रॉलर व त्यावरील तीन हजारांहून अधिक मच्छीमारांनी वास्कोतील समुद्राचा आश्रय घेतलेला आहे.

या चक्रीवादळाची चाहुल लागल्यापासून भारतीय तटरक्षक दलाने मानवतावादी भूमिकेतून प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्जता ठेवली होती. दि. 30 नोव्हेंबरपासून तटरक्षक दलाने शोध व बचाव कार्याच्या मोहिमेवर आहे. तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागीय मुंबई, कोचिन व कवारट्टी तळावरील पथकांनी विमाने, हेलिकॉप्टर व जहाजांच्या मदतीने तामिळनाडू, केरळ, लक्षाव्दीप येथील समुद्रात प्रथम मच्छीमारांसाठी बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत 183 मच्छीमारांचे जीव दलाने वाचवले आहेत. अद्यापही दलाने कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दिव अशा भागात शोध मोहिम चालूच ठेवलेली आहे.

वाचवलेल्या मच्छीमारांना सुरक्षित ठिकाणी हलवणे तसेच त्यांना वैद्यकीय मदत पुरवणे तसेच मच्छीमारांनी समुद्रापासून दूर राहण्यासाठी जागृतीही दलाने चालू ठेवली आहे.

मच्छीमारांसाठी एमपीटीतर्फे मदतकार्य

चक्रीवादळाच्या भीतीने मुरगाव बंदराजवळील समुद्रात आश्रयाला आलेल्या मच्छीमारांना मदत पुरवण्याचे काम एमपीटीने हाती घेतले आहे. सुरक्षेसाठी तीनशेहून अधिक ट्रॉलर व त्यावरील तीन हजारांहून अधिक मच्छीमारांनी वास्कोतील समुद्राचा आश्रय घेतलेला आहे.

 जेवणपाण्यासह वैद्यकीय सेवाही दिली

रविवारी संध्याकाळी व सोमवारी दिवसभरात तीनशेहून अधिक ट्रॉलर मुरगाव बंदराजवळ आलेले आहेत. हे ट्रॉलर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील आहेत. त्यावरील मच्छीमारांच्या जेवण पाण्याची सोय आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी एमपीटी पार पाडत आहे. गेले दोन दिवस एमपीटीतर्फे या मच्छीमारांना चहा, पाणी, नाश्ता, जेवण, औषधे अशी आवश्यक सेवा पुरवण्यात येत असून त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवाही उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून एमपीटीने हे मदतकार्य हाती घेतलेले आहे.

चाळीस मच्छीमारांवर वैद्यकीय उपचार

एमपीटीच्या अधिकाऱयांचे एक पथक हे काम पाहात असून वैद्यकीय सेवेसाठीही एमपीटीच्या डॉक्टरांसह वैद्यकीय पथक नेमण्यात आलेले आहे. आतापर्यंत चाळीस मच्छीमारांवर वैद्यकीय उपचार करण्यात आलेले आहेत. एमपीटीचे अध्यक्ष आय. जेयाकुमार या मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुरगाव बंदराशी निगडीत वेदांत ग्रुप व जिंदाल साऊथ वेस्ट पोर्टलाही त्यांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.

उद्यापर्यंत समुद्रातील वातावरण पूर्वपदावर आल्यास हे मच्छीमारी ट्रॉलर आपापल्या राज्यांकडे रवाना होतील.

राज्यात सर्वत्र मासळीची कमतरता

ओखी वादळामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने काल मासळी मार्केटात मासळीच उलपब्ध नव्हती. त्यामुळे मत्स्यप्रेमींची गैरसोय झाली. काहींनी सुक्या मासळीवरच समाधान मानणे पसंत केले. काल चिकन व अंडी पण महाग झाली. हॉटेलवाल्याना देख्नील मासळी मिळू शकली नाही, त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला. मात्र शनिवारपासून शाकाहारी दिवस अधिक असल्याने लोकांना मासळी मोठय़ा प्रमाणात गरज भासली नाही. मात्र आज बुधवारी सर्व लोक मासे खातात. उद्या गुरुवारी बरेच लोक मासे खात नाहीत. पुढील दोन दिवस तरी मासेमारी होऊ शकणार नाही. मानस, खाडीतील माशांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

Related posts: