|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्त्री आजही असुरक्षित, अबलाच!

स्त्री आजही असुरक्षित, अबलाच! 

कोपर्डी येथील पीडितेला अखेर न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात बजावलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. आज 21 व्या शतकात जग सर्वच क्षेत्रात फार पुढे गेलेले दिसते. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील वावरताना दिसत आहेत. किंबहुना सर्वच क्षेत्रात स्त्रियाच सरस असल्याचे सिद्धही होत आहे. पुरुषांनीही ते मान्य केल्याचे दिसते. प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी कमविण्यासाठी बाहेर पडताना दिसते. पण आजची ही स्त्री या समाजात वावरताना खरोखरच सुरक्षित आहे का हा प्रश्न कोपर्डीच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झाला आहे.

खरंच आजची स्त्री सुरक्षित नाही. कधी ना कधी, कुठे ना कुठे तरी तिला समाजात पुरुषाकडून एखादा तरी वाईट अनुभव येतोच येतो. हे सत्य कोणीच नाकारणार नाही. भले मग तो अनुभव कामाच्या ठिकाणी असो, शाळेमध्ये असो, गर्दीत असो, प्रवासात अथवा अन्य कुठे असो. आपल्या देशात रोज कुठे ना कुठे तरी एखादी तरी स्त्री बलात्कार, विनयभंग, छेडछाड याची शिकार होताना दिसते. मग ती लहान बालिका असो अगर वृद्धा असो. मीडियावाले, टीव्हीवर दाखवतात, पेपरात छापतात तेव्हाच आपल्याला सदरच्या घटना समजतात. त्यावेळी मग स्त्री-अत्याचाराविरोधी आंदोलने, मोर्चांना अगदी ऊत येतो. संपूर्ण समाज द्वेषाने ढवळून निघतो. अपराध्यास कधीतरी शिक्षा होतेच. वासनेची शिकार झालेल्या स्त्रीस, तिच्या नातेवाईकांस न्यायही मिळतो व कालांतराने सगळय़ा चर्चा, मोर्चे, घटना प्रसंगावर पडदा पडतो.

हे असे किती दिवस चालू राहणार. स्त्री ही पुरुषापेक्षा शरीराने नाजूकच असते. त्याबाबत ती किंबहुना आजही एक अबलाच आहे. पुरुषाच्या दांडगटपणाला, शारीरिक ताकदीने केलेल्या अत्याचाराला ती लगेच बळी पडते. तिने पुरुषाला प्रतिकार करायचा कितीही जरी प्रयत्न केला तरी तिला त्याच्यापुढे हार पत्करावी लागते.

‘झ्rानहूग्दह ग्s ंाttाr tप्aह म्ल्rा’ आपण आजारावर उपचार करण्याबरोबर आजार होऊच नये म्हणून म्हणजेच आजार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी धडपड करतो. त्याप्रमाणेच स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर न्याय मागण्याबरोबर स्त्रीवर अत्याचार होणारच नाहीत, हे आपण पाहिले पाहिजे.

एका पुरुषाला जन्म देणारी आई, ही एक स्त्रीच असते. अत्याचार करणाऱया पुरुषाला याचा विसर का बरे पडतो? तर अत्याचारी नराधमाला जडलेली ती एक विकृत वासना असते. त्याला त्यातून वासनाशमनाचा आसुरी आनंद मिळतो. त्यामुळे अत्याचार, बलात्कार करणारा पुरुष हा वासनांध होऊन, एक नराधम बनून स्त्रीला आपल्या विकृत वासनेची शिकार बनवतो. यासाठीच संपूर्ण समाजानेच अशा पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषांच्या असल्या विकृत वासनेला संपविण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने विचार-परामर्श केला पाहिजे. देशपातळीवर यासाठी चर्चासत्रे, समुपदेशन घडून येण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. केवळ बलात्कारासारख्या घटना घडून गेल्यावर जागे होऊन उपयोग नाही.

स्त्रीचे महत्त्व पुरुषांना पटवून दिले पाहिजे. ती भोगा-त्यागाची वस्तू नसून ती सुद्धा एक माणूस आहे, याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक तरी स्त्री ही असतेच असते. मग कधी ती त्याची माता म्हणून तर कधी बहीण, कधी पत्नी म्हणून तर कधी मुलगी. आपल्या आयुष्यात एखादी स्त्री असूनदेखील एखादा विकृत पुरुष दुसऱया (परक्मया) स्त्रीवर अत्याचार कसे बरे करतो? हा आज खरे तर एक संशोधनाचा विषय मानायला हरकत नाही. आपल्या जवळच्या स्त्रीशी एखादा परका पुरुष गैरवर्तन करतो, त्यावेळी त्या संबंधित पुरुषास ते सहन होत नाही. मात्र आपण ज्या स्त्रीवर अत्याचार करतो तीदेखील दुसऱया कोणाची तरी कुणीतरी लागत असते, याचा तो का विचार करीत नाही? असे करून तो एका अबलेचे जीवन तर उद्ध्वस्त करतोच पण आपल्या जवळच्या स्त्रीलादेखील असुरक्षित बनवतो.

निसर्गतःच विधात्याने पुरुषाला सामर्थ्यवान व स्त्रीला कमजोर बनविले आहे, हे सत्य समाजाने स्वीकारायला हवे व स्त्री सुरक्षिततेसाठी पावले उचलली पाहिजेत. केवळ नराधमांना शिक्षा दिल्याने प्रश्न सुटू शकत नाही. स्त्रीने केवळ अन्यायाला वाचा फोडतच बसायचे का? तर सामाजिक जनजागृती घडवून आणली पाहिजे. यासाठी पुरुषांना समुपदेशन करणे फार गरजेचे आहे. यासाठी एका ‘स्त्री’चे आपल्यासाठी काय मोल आहे, हे त्याला पटवून दिले पाहिजे. माता आपल्या उदरात 9 महिने मुलाला वाढवून जन्म देते. पुढे तोच मुलगा मोठा झाल्यावर स्त्री-पातक करतो, स्त्री-विकृत बनतो. यापेक्षा नक्कीच दुसरे कोणतेच मोठे दु:ख त्या मातेला नसेल. अशावेळी ‘हा वंशाचा दिवा जन्माला आलाच नसता तर बरे झाले असते.’, असेच ती माता
म्हणेल.

स्त्री ही पुरुषांपेक्षा शरीराव्यतिरिक्त इतर कोणत्याच दृष्टीने अबला ठरताना दिसत नाही. त्यामुळे स्त्रीची काळजी समाजानेच घेतली पाहिजे. तिचे संरक्षण समाजानेही केले पाहिजे. तिच्यावर अत्याचार होण्यापूर्वीच समाजाने तिची दखल घेतली पाहिजे. जोवर विकृत-वासनांध पुरुष उजळ माथ्याने स्त्रीचा सर्वनाश करीत राहतील. तोपर्यंत आजचे जग फार विकसित झालेले आहे, असे आपण म्हणूच शकत नाही. अत्याचार, बलात्कार यासारखे प्रसंग स्त्रीच्याबाबतीत घडूच नयेत यासाठी समाजाने, सरकारने योग्य ते शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषात सुधारणा घडवून आणली पाहिजे. स्त्री चळवळ संघटित केली पाहिजे. स्त्री आज कितीही प्रगत झाली असली तरी पुरुषाशिवाय ती असुरक्षितच आहे. तिला पुरुषाच्या साथीची, आधाराची गरज पूर्वीही होती तशी आजही आहे. जोवर निसर्ग स्त्रीला सबला बनवू शकत नाही तोवर स्त्री ही अबलाच बनून राहील आणि हेच कटु सत्य आहे!

Related posts: