|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुर्लक्षित वनौषधींवर संशोधनाची गरज

दुर्लक्षित वनौषधींवर संशोधनाची गरज 

डॉ.अशोक वाली यांचे प्रतिपादन,सावंतवाडीत वैदू संमेलन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

जगात पाच लाख वनस्पती आहेत. त्यापैकी साधारणत: पाच हजार वनस्पतींचा औषधामध्ये वापर होतो. अन्य वनस्पतींमध्येही औषधी गुणधर्म असू शकतात. त्यामुळे या वनस्पतींचे वैद्यकीयदृष्टय़ा संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संगमनेर येथील अश्विन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक तथा वनस्पती अभ्यासक डॉ. अशोक वाली यांनी येथे केले.

येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात सुंदरवाडी आयुर्वेदिक वनौषधी उत्पादक सहकारी संस्था व सिंधु निसर्ग पर्यावरण प्रतिष्ठान यांच्यातर्फे वैदू संमेलनाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शुभदादेवी भोसले अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गजानन गावडे, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, डॉ. बाळकृष्ण गावडे, सिंधु निसर्ग पर्यावरण संस्थेचे सचिव डॉ. गणेश मर्गज, डॉ. शिरसाट, सचिन देसाई, जॉर्ज पेप्पर आदी उपस्थित होते.

अशोक वाली यांनी सांगितले की, कोकणात विपुल प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. येथील अनेक वैद्य या वनस्पतींच्या माध्यमातून औषधे देऊन समाजसेवा करत आहेत. येथील वैदूंनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान दुसऱया पिढीला दिले पाहिजे. त्यामुळे औषधी वनस्पतींचे ज्ञान टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. मर्गज यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रगती अमृते यांनी केले. आभार डॉ. भारमल यांनी मानले. यावेळी वनस्पतीतज्ञ मार्सेलिन आल्मेडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय देसाई, प्रा. व्ही. पी. सोनाळकर, प्रा. डी. डी. गोडकर आदी उपस्थित होते. यावेळी 100 हून अधिक वैदू उपस्थित होते. संमेलनानिमित्त वनौषधींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

Related posts: