|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वादळात भरकटलेल्यांना देवगडने दिला ‘किनारा’

वादळात भरकटलेल्यांना देवगडने दिला ‘किनारा’ 

ब्रिटिशांना समजली बंदराची महती, मात्र मायबाप सरकार निद्रीस्त

राजेंद्र मुंबरकर / देवगड:

अरबी समुद्रात ओखी वादळ धडकले आणि सगळय़ांच्या काळजाचा ठोका चुकला. महाप्रलयकारी वादळ येणार या भीतीनेच अनेक मच्छीमार भर समुद्रात जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. अशावेळी धावून आला तो देवगडचा किनारा… आणि गोवा ते मुंबई सागरी किनाऱयावरील सर्वात सुरक्षित असलेले बंदर म्हणजेच देवगड बंदर… या बंदरानेच शेकडो मच्छीमारांना आणि लाखो रुपयांच्या किंमती असलेल्या अत्याधुनिक नौकांना कुशीत घेऊन नुकसान वाचविले. देवगडची एवढी सुरक्षितपणाची महती असताना स्वातंत्र्यानंतरही या बंदराच्या विकासाबाबत मायबाप सरकारचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत. विकासापासून वंचित असलेल्या या बंदराची महती ब्रिटिश सरकारला आली होती. मात्र, शासनकर्त्यांना येऊ नये, हेच दुर्देव आहे.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित असे नैसर्गिक बंदर म्हणून देवगड बंदराची ओळख आहे. बंदराच्या चारही दिशांना उंच डोंगर अशी भौगोलिक स्थिती असून पश्चिमेकडून बंदरात येण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यामुळे कितीही मोठे वादळ या किनाऱयावर आले तरी येथील नौकांना किंवा या परिसरातील वस्त्यांना याचा धोका पोहचू शकत नाही. ब्रिटिशांनी या बंदराची महती ओळखून त्याकाळात बंदराचा विकास करण्यासाठी निधी खर्च केला होता. इ. स. 1860 पूर्वीपासूनच हे बंदर व्यापारी बंदर म्हणूनच ओळखले जात होते. अनेक वस्तुंची आयाय-निर्यात याच बंदरातून करण्यात येत होती. त्यामुळे देवगडचे नाव जगाच्या कानाकोपऱयात पोहचले होते. देवगडचा जगात नावलौकीक असलेला हापूस आंबा काही दशकापूर्वी नावारुपाला आला असला तरी देवगडची खरी ओळख ही व्यापारीकरणासाठी उपयोगी येणाऱया सुरक्षित बंदरामुळे होती. कोकण किनारपट्टीवरील सर्वात खोल बंदर म्हणून विजयदुर्गाचा उल्लेख केला जातो. मात्र, याच बंदरालगत असलेले देवगड बंदर हे नैसर्गिकरित्या सुरक्षित बंदर म्हणून ओळखले जाते. एकीकडे विजयदुर्ग बंदराचा आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकासाठी केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारची धडपड सुरू असताना याच शासनाला देवगड बंदराचा विसर पडावा हे दुर्देव आहे. येथील आनंदवाडी बंदर जेटी प्रकल्प गेली 25 वर्षे अनेक कारणांमुळे रखडला आहे. या बंदराचा विकास झाला असता, तर अशा आपत्तीच्या काळामध्ये मच्छीमारांना अनेक सुविधा प्राप्त झाल्या असत्या. या बंदरात सध्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे या बंदरात हजारोंच्या संख्येनी दाखल झालेल्या मच्छीमारांना सुविधा देण्याचा प्रयत्न झाला. यात महसूल विभाग, नगरपंचायत, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी परराज्यातील मच्छीमारांना मदतीचा हात दिला.

बंदर व आनंदवाडी खाडी गाळाने भरली

देवगड बंदर यापूर्वी विजयदुर्गप्रमाणेच खोल बंदर म्हणून ओळखले जात होते. या बंदराची नैसर्गिक जडणघडणीमुळे खाडीतून येणारा गाळ हा समुद्रात वाहून जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यामुळे देवगड बंदर व आनंदवाडी खाडी ही गाळाने भरुन गेली आहे. हा गाळ काढण्यासाठी सरकार कोणतीही भूमिका घेत नाही. यापूर्वी फयान वादळाच्या काळात याच देवगड बंदराने अनेक मच्छीमारांना आश्रय दिला होता. आनंदवाडी बंदर जेटी प्रकल्पाच्या कामातील अनेक तांत्रिक अडथळे दूर झाल्याची माहिती येथील लोकप्रतिनिधी देतात मग या बंदराचा अजून विकास का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

देवगड बंदराची वैशिष्टय़े

देवगड बंदराची अनेक वैशिष्टय़े आहेत. इ. स. 1939 ते 1943 या कालावधीत बंदरात पाण्याची खोली खूप होती. प्रवासी बोट सेवाही याठिकाणी सुरू होती. सन 1975 साली प्रवासी बोट वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, ‘कोकणशक्ती’ व ‘कोकणसेवक’ या प्रवासी बोटी सुरू होत्या. या बोटीही सन 1984 साली बंद झाल्या. सरकार आता प्रवासी बोटी सुरू करण्याच्या प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रवासी बोटींना देवगड बंदरात थांबा नाही. ब्रिटिशांनी या बंदराचा आरमारासाठीही उपयोग करायचे ठरवले होते. आरमाराच्या दृष्टीनेही हे बंदर अत्यंत सुरक्षित बंदर आहे. सन 1971-72 च्या भारत-पाक युद्धाच्या काळातही देवगड बंदराचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर सरकारच्या उदासीनतेमुळे हे कामही रखडले. 17 व्या शतकात देवगड किल्ल्याची उभारणी करण्यात आली. या किल्ल्याचा आरमारासाठीच उपयोग करण्यात येणार होता. विजयदुर्ग किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी देवगड किल्ला उभारण्यात येत होता. त्यासाठी देवगड बंदराचा विकासही त्या काळात करण्याचा मानस होता. ब्रिटिशांनी या बंदराच्या विकासासाठी खास निधी खर्च केला होता. यावरुन ब्रिटिशांना देवगड बंदराचे महत्व कळून चुकले होते.

आनंदवाडी बंदर जेटीचे

काम मार्गी लागणे आवश्यक

ओखी वादळ कोकण किनाऱयावर धडकले आणि त्याचवेळी परराज्यातील सुमारे पाचशे नौका समुद्रात मिळेल तशा मार्ग काढत जीव वाचविण्यासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या. देवगड बंदरात आपल्या राज्यातील नौका दाखल झाल्या याची कल्पना तेथील प्रशासन व शासनकर्त्यांना होते. अशावेळी आपल्या लोकांना आधार देण्यासाठी व त्यांच्या मदतीला धावून येण्याची त्यांची तळमळ पाहता आपल्यातील तळमळीतील मायेचा ओलावा नेमका कुठे लुप्त झाला. देवगड आनंदवाडी बंदर जेटी प्रकल्पाचे काम आता मार्गी लागणे आवश्यक आहे. अनेक वादळे येतील व जातील. पण जेव्हा सुरक्षिततेसाठी देवगड बंदराकडे नौका येतील तेव्हा त्यांना कोणतीच सुविधा देण्यासाठी आपल्याकडे नसतील. आजही या घटनेतून तेच दिसून आले आहे.

कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी..!

देवगड बंदरात कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. हजारो मच्छीमारांचा जीव वाचविला,  त्यांना अन्न व पाणी देऊन अहोरात्र सेवा केली ती येथील अधिकारी व कर्मचारीवर्गाने. मात्र, अशा संकटावेळी कायमस्वरुपी दिलासा मिळण्यासाठीची उपाययोजना करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पावले उचलली पाहिजेत. देवगड बंदराचा विकास हा झपाटय़ाने होण्यासाठी या घटनेची शल मनात ठेवून आता काम केले पाहीजे. शंभर कोटीच्या घरात पोहचलेले देवगड बंदराचे काम जर अशाचप्रकारे शासनाच्या उदासीन धोरणामुळे रखडले, तर ते हजारो कोटीच्या घरात पोहचेल आणि त्यावेळी देवगड केवळ कागदोपत्री विकासासाठी प्रतीक्षेत असलेले बंदर ठरेल.

Related posts: