|Monday, October 22, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देखिला भगवंत यशोदेने

देखिला भगवंत यशोदेने 

आता चला गोकुळात! इकडे गोकुळात काय झाले याचे वर्णन नामदेवराय करतात-

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती ।  श्रवण करितां तृप्ती नाहीं तुज ।1। माया जातां मथुरे सावध निद्रिस्थ ।

देखिला भगवंत यशोदेनें ।2। अनंत ब्रह्मांडे उदरिं न कळे कोणाला ।  वाजविती थाळा जन्मकाळीं ।3।

यज्ञमोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा ।  ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ।4। गौळणी बाहाती नंदालागीं तेव्हां ।

पुत्रमुख पाहा नामा म्हणे ।5।

महामुनि शुकदेव परिक्षित राजाला म्हणाले, ज्या कथेच्या एकवार श्रवणाने तुझी तृप्ती होणार नाही व जी कथा पुनः पुन्हा ऐकाविशी वाटेल अशी ही भगवंताची कथा ऐक. वसुदेवाने मायारूपी कन्येला मथुरेला नेल्यावर यशोदा जागी झाली. त्यावेळी तिने आपल्या कुशीत निजलेल्या बालरूपातील भगवंताला पाहिले. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरामध्ये सामावलेली आहेत त्याचा महिमा कोणाला बरे कळणार? यशोदेला मुलगा झाला हे कळल्यावर सर्वांनी मिळून थाळे, ताटे वाजवली. ज्याच्यासाठी यज्ञ केला जातो, जो यज्ञभोक्ता आहे आणि महादेव शंकर ज्याचे ध्यान करतात त्याने रडू नये म्हणून त्याला दुधात कपडा भिजवून त्याचा बोळा तोंडात देतात. नामदेवराय म्हणतात, गौळणींनी नंदाला हाक मारून पुत्रमुख पहा असे
सांगितले.

यशोदा व नंद या दांपत्याला वृद्धावस्था आली तरी मुल झाले नव्हते. पण हे दांपत्य गोकुळात अत्यंत लोकप्रिय होते. जी दुसऱयाला यश देते ती यशोदा आणि जो सगळय़ांना आनंद देतो तो नंद! शांडिल्य ऋषींच्या सांगण्यावरून नंदाला मुलगा व्हावा म्हणून केवळ नंद यशोदाच नव्हे तर गोकुळातील आबालवृद्ध सर्व नर नारी एकादशी व्रत करत होते. जन्माष्टमी दिवशी नंदाने बारा वाजेपर्यंत जागरण केले. नंतर सर्वजण गाढ झोपी गेले. भगवान बाल रुपात नंदाच्या घरी आले तेव्हा नंदबाबा निजलेले होते. नंदबाबांनी स्वप्नात पाहिले की कित्येक मोठमोठे ऋषीमुनि त्यांच्या अंगणात आलेले आहेत, यशोदेने शृंगार केला आहे आणि तिच्या मांडीवर एक सुंदर बाळ खेळत आहे. त्या बाळाला ती न्याहाळत आहे. भगवान शंकर देखील त्या बाळाचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत.

नंदबाबांना प्रात:काळी जाग आल्यावर मनात अनेक संकल्प विकल्प करीत करीत गोशाळेत आले. ते स्वतः गोसेवा करीत.

भागवताचार्य वै. डोंगरे महाराज सांगत-कित्येक वर्षे तपश्चर्या करूनही महाऋषिमुनींचा काम नष्ट झाला नाही. अभिमान नि:शेष झाला नाही. तेव्हा ते सर्व निष्काम होण्याच्या इच्छेने गायींच्या रूपांत गोकुळात आले.

नंदबाबांनी प्रार्थना केली-हे नारायणा! दया करा, माझ्या घरी गोसेवकाचा जन्म होवो. त्याचवेळी भगवंताने लीला केली. पिवळा अंगरखा घातलेले, कपाळावर कस्तुरीचा टिळा असलेले एक बालक गुढघ्यावर रांगत रांगत गोशाळेत आले. या बाळाला नंदांनी पाहिले आणि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले-अरे! हे तर तेच बाळ आहे जे मी आज स्वप्नात पाहिले.

Related posts: