|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मच्छीमारांसाठी देवगड बंदरच अधिक सुरक्षित!

मच्छीमारांसाठी देवगड बंदरच अधिक सुरक्षित! 

गृहराज्यमंत्र्यांची देवगड बंदराला भेट : परप्रांतीय नौका चालकांशी साधला संवाद : बंदर विकसित होण्यासाठी प्रयत्नशील!

प्रतिनिधी / देवगड:

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या मच्छीमारी नौकांना देवगड बंदरात सुरक्षित आश्रय मिळाला. मोठय़ा वादळांमध्ये मच्छीमारांसाठी हे सुरक्षित बंदर असल्याचे स्पष्ट झाले असून बंदर विकसित करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. देवगड बंदरच्या आश्रयाला आलेल्या परप्रांतीय नौका व त्यावरील खलाशांना महाराष्ट्र शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या सोयीसुविधा दिल्या जातील, अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

केसरकर यांनी बुधवारी सकाळी देवगड बंदराला भेट देऊन तेथे आश्रयास आलेल्या परप्रांतीय नौकांवरील कर्मचाऱयांशी प्रत्यक्ष नौकांवर जाऊन संवाद साधला. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण, देवगड तहसीलदार सौ. वनिता पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, ऍड. प्रसाद करंदीकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, उपसभापती संजय देवरुखकर, देवगड पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, बंदर अधिकारी ताह्मणकर, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी वारुंजीकर आदी उपस्थित होते. केसरकर यांनी देवगड बंदर कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची व आश्रयास आलेल्या पाच राज्यांतील नौकांना पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. परप्रांतीय नौकांना साहित्य पुरविण्यासाठी चार स्थानिक नौका भाडेतत्वावर ताब्यात घ्याव्यात. प्रत्येक नौकेचा सर्व्हे करून त्यांना आवश्यक धान्य, इंधनाचा पुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या.

आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा करा!

देवगडचे अर्थकारण बदलून टाकणारा आनंदवाडी बंदर प्रकल्प सध्या शासनाच्या लालफितीत अडकला असून या प्रकल्पाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. देवगड हे सुरक्षित बंदर असल्यामुळे हा प्रकल्प होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक मच्छीमार नेते भाई खोबरेकर व युवा मच्छीमार तुषार पाळेकर यांनी गृहराज्यमंत्र्यांकडे केली.

प्रकल्पासाठी लवकरच स्वतंत्र बैठक

आनंदवाडी बंदर प्रकल्पाबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल. या बैठकीला स्थानिक मच्छीमारांनी उपस्थित राहून सूचना मांडाव्यात. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपणाकडून निश्चितच प्रयत्न व पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी स्थानिक मच्छीमारांना दिले. खाडय़ांमधील गाळांची समस्या गंभीर बनली असून ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून खाडय़ांच्या मुखाजवळील गाळ काढण्याचे कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वॉटर स्पोर्टस् युनिट होणार

पर्यटन विकासाच्या माध्यमातून देवगड बंदर धक्क्यावर हायमास्ट टॉवर व रेलिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यासाठी मच्छीमार समाजातील स्थानिक बेरोजगार युवकांकडून अर्ज मागवून घ्यावेत. त्यानंतर येथे वॉटर स्पोटर्स युनिट सुरू करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, येथील समुद्र किनाऱयालगतची जंगली झाडी-झुडपे तोडण्याची मोहीम तात्काळ राबवावी, अशा सूचना केसरकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना केल्या. तर मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसून सागर सुरक्षा रक्षकही गेले सहा महिने वेतनाविना काम करीत आहेत, याकडेही मच्छीमार नेते खोबरेकर यांनी लक्ष वेधले.

Related posts: