|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चष्मे, चष्मे, चष्मे

चष्मे, चष्मे, चष्मे 

आमचे एक मित्र अनिल आठलेकर हे उत्तम कवी आहेत. शिवाय त्यांचे मोठे चष्म्यांचे दुकान आहे. आधीच कवी म्हटल्यावर ‘जे न देखे रवी’ ते पाहू शकणारा माणूस. त्यात स्वतःचे चष्म्यांचे दुकान म्हटल्यावर त्यांची नजर किती तीक्ष्ण असेल हे सांगायला नको. परवा अनिलरावांनी एका हॉटेलने केलेली ‘अख्खा मसूर’ या पदार्थाची जाहिरात पाहिली. आता कोणतीही गृहिणी मसूर शिजवताना तो अख्खाच शिजवणार की. मसूर काही कोणी विळीवर चिरत नाही किंवा मिक्सरवर बारीक करीत नाही. ती जाहिरात पाहून अनिलरावांनी फेसबुकवर गमतीने लिहिलं की आता आपण देखील दुकानासमोर ‘येथे अख्खा चष्मा मिळेल’ अशी पुणेरी पाटी लावावी. त्यावरून काही कल्पना सुचल्या.

दुकानात ‘पुणेरी चष्मा’ विकायला ठेवता येईल. या चष्म्याचा नंबर डॉक्टरने सांगितलेल्या नंबरपेक्षा थोडा जास्त ठेवावा लागेल. म्हणजे वाचताना मजकूर जास्त स्पष्ट दिसून त्यातल्या जास्तीत चुका काढता येतील. या चष्म्याच्या काडय़ा लवचिक बनवल्या तर त्यांच्या टोकांना कापूस लावून ती टोके कानात घालता येतील आणि दुपारी बारा ते चार वामकुक्षी घेता येईल. चार वाजले की काडय़ा कानातून बाहेर काढायच्या. सोलकढीच्या रंगाची गुलाबीसर काच वापरून मालवणी गॉगल बनवता येईल. किंवा काचेला विविध माशांचे आकार देऊन मत्स्यप्रेमींना आवडेल असा सामिष चष्मा तयार करता येईल. प्रेमला लवंगी मिरचीचा आकार देऊन कोल्हापुरी चष्मा बनवता येईल. गॉगल बनवण्यासाठी पांढरा किंवा लाल रंग असलेल्या प्रेम्स वापरता येतील. इडलीच्या आकाराची गोल काच वापरून बनवलेला दक्षिणी चष्मा देखील छान दिसेल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून सरकार असे अद्भुत चष्मे बनवू शकेल की ते घातल्यावर लोकांना रस्त्यावरचे खड्डे दिसणार नाहीत, वर्तमानपत्रात किंवा अन्यत्र आलेली सरकारवरची टीका वाचता येणार नाही. याच्या ठीक विरुद्ध गुणधर्म असलेले चष्मे विरोधक बनवू शकतील. 

जातींचे, धर्मांचे वगैरे अदृश्य चष्मे पुढाऱयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळय़ांवर असतातच. त्यामुळे त्यांना सत्य कधी दिसत नाही. सत्य बघावे आणि जनतेला दाखवावे अशी त्यांना इच्छा देखील नसते. त्यांच्यासाठी नितळ काचेचे रंगहीन चष्मे बनवणे आणि ते सक्तीने पुढाऱयांच्या डोळय़ांवर कायमचे चिकटवावे ही काळाची गरज आहे. पुढाऱयांच्या डोळय़ांवर असे चष्मे सक्तीने चढवले तर समाजातले गढूळ वातावरण थोडे सुधारेल अशी आशा करायला हरकत नाही.

Related posts: