|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लग्नाआधीच तरुणाला मृत्यूने गाठले

लग्नाआधीच तरुणाला मृत्यूने गाठले 

डेगवे येथील अपघातात माजगावचा तरुण ठार : पाच दिवसांवर होते लग्न, देवरुखला होता नोकरीला

प्रतिनिधी / बांदा:

 वैवाहिक आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱया तरुणाचा अपघाती अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी डेगवे येथे घडली. माजगाव-खालचीआळी येथील किरण रविकांत सावंत (32) हा स्वतःच्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी दुचाकीने जात असतांना डेगवे बाजारवाडी येथे बोलेरो जीपची जोरदार धडक बसली. या अपघातात किरणचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असणारा चुलत भाऊ अनिकेत चंद्रकांत सावंत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास झाला.

 अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या दोघांना स्थानिकांनी रिक्षाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याआधीच किरण याचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी किरण याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर जखमी अनिकेत याच्यावर उपचार करून सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातप्रकरणी बांदा पोलिसांनी बोलेरोचा चालक रामदास सुभाष स्वार (30, रा. डेगवे-बाजारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

 किरण सावंत याचे सोमवारी 11 डिसेंबरला लग्न होते. तो आपला चुलत भाऊ अनिकेत सावंत याला सोबत घेऊन कुडासे येथे नातेवाईकांना लग्नपत्रिका देण्यासाठी ऍक्टिव्हा दुचाकीने (जीए-11/सी-0435) जात होता. ते बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे बाजारवाडी येथे आले असता त्याचदरम्यान डेगवे येथून बांद्याच्या दिशेने येणारी बोलेरो पिकअप (एमएच-07/पी-2656) आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. चालक किरण सावंत सुमारे 25 ते 30 फूट दूर फेकला जात रस्त्यावर आदळला. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. तर त्याच्या मागे बसलेला चुलत भाऊ अनिकेत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

 अपघाताचे वृत्त समजताच डेगवे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना रिक्षातून बांदा प्राथमिक आरोग्य पेंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉ. पाटील यांनी किरण मृत झाल्याचे सांगितले. तर जखमी अनिकेतवर उपचार करून सावंतवाडी येथे पाठविले. बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, हेडकॉन्स्टेबल दिलीप धुरी, संजय कदम, प्रीतम कदम, मनिष शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहने बाजूला केली. डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 माजगाव परिसरातील ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, माजगाव सरपंच दिनेश सावंत, आबा सावंत, अजय सावंत, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई यांच्यासह डेगवे आणि माजगाव ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

                           लग्नाआधीच काळाचा घाला

 मृत किरण सावंत याचे लग्न अवघ्या पाच दिवसांवर होते. किरण देवरुख – रत्नागिरी येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. सोमवारी लग्न असल्याने तयारीसाठी म्हणून तो तीन दिवसांपूर्वी माजगावला घरी आला होता. मंगळवारी त्याने आपल्या मित्रपरिवाला निमंत्रण दिले होते. तर बुधवारी दोडामार्गमधील नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी तो घरातून लवकर निघाला होता. कुडासे येथे नातेवाईकांना पत्रिका देऊन तो तांबोळी येथे नातेवाईकांकडे जाणार होता, असे उपस्थित नातेवाईक व मित्रमंडळींनी सांगितले. मात्र, लग्नाआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला.

                             नातेवाईकांचा आक्रोश

अपघाताचे वृत्त समजताच किरणचे नातेवाईक बांदा प्राथमिक आरोग्य पेंद्रात दाखल झाले. किरणचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी एकच आक्रोश केला. किरणच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

                             माजगाववर शोककळा

किरण हा मनमिळावू, मेहनती व प्रामाणिक होता. तो नोकरीनिमित्त देवरुख येथे असला तरी त्याचे माजगाव येथील मित्रपरिवारासोबत चांगले संबंध होते. तसेच तो सर्व कार्यक्रमांना माजगाव येथे येत असे. त्याच्या अकाली जाण्याने बांदा आरोग्य केंद्रात जमलेल्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले. किरणच्या अकाली मृत्यूने माजगाव परिसरावरही शोककळा पसरली.

Related posts: