|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चैत्यभूमीवर भीमबांधवांचा सागर

चैत्यभूमीवर भीमबांधवांचा सागर 

प्रतिनिधी/ मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवारी चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर लोटला होता. राज्यासह देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. सोमवारपासून ओक्खी वादळाचा तडाखा मुंबईला बसला होता. मंगळवारी सततच्या पडणाऱया पावसामुळे चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर चिखल, पाणी साचले होते. वाऱयाच्या वेगाने मंडप कोसळल्यामुळे अनुयायांचे हाल झाले होते. त्याचा परिणाम बुधवारीही जाणवला, मात्र भीमसैनिकांची गर्दी कमी झाली नव्हती. त्यांच्यात एक वेगळीच स्फूर्ती अनुभवयास मिळाली.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मफतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होतात. हातात निळा झेंडा, डोक्यावर टोपी आणि तोंडात बाबासाहेबांचे नाव घेत आंबेडकर अनुयायांची चैत्यभूमीवर गर्दी उसळली होती. सकाळपासून होत असलेली गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. वाढती गर्दी लक्षात घेऊन चैत्यभूमीवर मोठय़ा प्रमाणात स्वंयसेवकांची नेमणूक करण्यात आली होती.

बुधवारी पावसाने उसंत घेतली असली तरी सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवर सर्वत्र चिखल झाला होता. मंडपात आणि मंडपावरती पावसाचे पाणी साचल्यामुळे भीमसैनिकांची गैरसोय झाली होती. दरवर्षी नियोजन समितीच्यावतीने बैठक घेऊन अनुयायांसाठी सुविधा पुरविण्यात येते. मात्र यंदा पावसामुळे सर्व नियोजन बदलले. अचानक आलेल्या पावसामुळे समितीला पुन्हा नव्याने नियोजन करून अनुयायांची गैरसोय दूर करावी लागली.

Related posts: