|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर युनायटेड उपउपांत्यपूर्व फेरीत

मँचेस्टर युनायटेड उपउपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

मँचेस्टर युनायटेडने पिछाडी भरून काढत सीएसकेए मॉस्कोचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून गट अ मध्ये अग्रस्थान मिळवित चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याच गटात बॅसेलने बेनफिकाचा 2-0 असा पराभव केला.

या विजयानंतर मँचेस्टर युनायटेडने 15 गुणांसह गटात पहिले स्थान मिळविले. दुसऱया स्थानावरील बॅसेलचे 12 तर तिसऱया स्थानावरील मॉस्कोचे 9 गुण झाले आहेत. पूर्वार्धात मँचेस्टर युनायटेडने अनेक चांगल्या संधी वाया घालविल्यानंतर त्यांच्यावर पिछाडीवर पडण्याची वेळ आली. मध्यंतराच्या सुमारास मॉस्कोच्या क्हिटिन्होने मारलेला फटका ऍलन झागोएव्हच्या पाठीला लागून गोलजाळय़ात गेला. पण उत्तरार्धात रोमेलु लुकाकू व मार्कुस रॅशफोर्ड यांनी गोल नोंदवून मँचेस्टरला आघाडी मिळवून दिली. 64 व्या मिनिटाला लुकाकूने मँचेस्टरला बरोबरी साधून दिली. आधी तीनदा संधी गमविलेल्या रॅशफोर्डला अखेर गोल नोंदवण्यात यश मिळाले. 65 व्या मिनिटाला जुआन माटाकडून मिळालल्या पासवर तेरा मीटर्सवरून त्याने मारलेला जबरदस्त फटका गोलंरक्षक अकिनफीव्हला कोणतीही संधी न देता जाळय़ात गेला.

लिस्बनमध्ये झालेल्या सामन्यात बॅसेलच्या मोहमद अल युनूसीने हेडरवर पहिला गोल नोंदवला. यासाठी त्याला मायकेल लँगकडून क्रॉस पास मिळाला होता. उत्तरार्धात दिमित्री ओबरलिननेही हेडरवरच संघाचा दुसरा गोल नोंदवून बेनफिकावरील विजय निश्चित केला. सहा सामन्यांत बेनफिकाला एकही गुण मिळविता न आल्याने त्यांना गटात तळाचे स्थान मिळाले.

Related posts: