|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रीय क्रीडा पर्यवेक्षकपदाचा सुशील कुमारचा राजीनामा

राष्ट्रीय क्रीडा पर्यवेक्षकपदाचा सुशील कुमारचा राजीनामा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमच्या पावलावर पाऊल टाकत दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशील कुमारनेही राष्ट्रीय क्रीडा कुस्ती पर्यवेक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या मार्चमध्ये त्यावेळचे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी 12 जणांची राष्ट्रीय क्रीडा पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली होती, त्यात 34 वषीय सुशील कुमारचाही समावेश होता. ‘मल्ल सुशील कुमार व बॉक्सर मेरी कोम यांनी राष्ट्रीय क्रीडा पर्यवेक्षक पद सोडत असल्याचे राजीनामापत्र सादर केले आहे,’ असे क्रीडा मंत्रालयाने निवेदनाद्वारे बुधवारी सांगितले. ‘दोघेही आपापल्या क्रीडा क्षेत्रात अजून कार्यरत असल्याने त्यांना व्यावसायिक हितसंबंधाची अडचण असल्याचे वाटले असावे. खेळाच्या परंपरेचा वारसा लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपविला असून क्रीडा मंत्रालयाने त्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत,’ असेही त्यात म्हटले आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुशील व मेरी कोम या दोघांचेही त्यांनी केलेल्या सेवेबद्दल आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आहेत. मेरी कोमने मागील आठवडय़ातच मुष्टियुद्धातील राष्ट्रीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी विद्यमान क्रीडापटूंचा विचार केला जाणार नसल्याचे राठोड यांनी जाहीर केल्यानंतर मेरी कोमने राजीनामा दिला होता.

Related posts: