|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 120 धावांनी विजय

दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 120 धावांनी विजय 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

दुसऱया ऍशेस कसोटीत पाचव्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची समान संधी असताना मिचेल स्टार्कच्या (88 धावांत 5 बळी) वेगवान माऱयापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना 120 धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात नाबाद शतकी खेळी साकारणाऱया शॉन मार्शला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील तिसरी कसोटी 14 ते 18 डिसेंबरदरम्यान पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे पाच बळी व कर्णधार रुटच्या नाबाद अर्धशतकामुळे प्रकाशझोतातील दुसरी कसोटी जिंकण्याची इंग्लंडला नामी संधी होती. ऑसी संघाने विजयासाठी ठेवलेल्या 354 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेरीस 4 बाद 176 धावा जमवल्या होत्या. पाचव्या दिवशी विजयासाठी 178 धावांची गरज असताना मात्र मिचेल स्टार्क व हॅजलवूडच्या माऱयापुढे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 84.2 षटकांत 233 धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडने 4 बाद 176 धावसंख्येवरुन पाचव्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला.  डावातील दुसऱयाच षटकांत इंग्लंडची मदार असलेल्या कर्णधार रुटला 67 धावांवर हॅजलवूडने बाद करत विजयातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर ऑसी गोलंदाजानी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अखेरीस इंग्लंडचा दुसरा डाव 84.2 षटकांत 233 धावांवर आटोपला व ऑस्ट्रेलियाने 120 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. बेअरस्टो (36) वगळता इतर तळाच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 5, हॅजलवूड व लियॉन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवत विजयात निर्णायक भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 442/8 घोषित व 138, इंग्लंड प.डाव 227 व दुसरा डाव 84.2 षटकांत सर्वबाद 233 (ज्यो रुट 67, बेअरस्टो 36, डेव्हिड मालन 29, स्टोनमन 36, मिचेल स्टार्क 5/88, हॅजलवूड 2/49, लियॉन 2/45).

पर्थ कसोटीसाठी ऑसी संघात अष्टपैलू मिचेल मार्शचा समावेश

पर्थ : ऍशेस मालिकेत पहिल्या दोन्ही कसोटीत शानदार विजय मिळवल्यानंतर उभय संघातील तिसरी कसोटी पर्थ येथे होणार आहे. या कसोटीसाठी ऑसी संघात अष्टपैलू मिचेल मार्शला संधी देण्यात आल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली. पहिल्या दोन कसोटीत दुखापतीमुळे मार्शला सहभागी होता आले नव्हते. आता तो दुखापतीतून सावरला असून तिसऱया कसोटीत त्याला संधी मिळेल, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी स्पष्ट केले.

Related posts: